होमपेज › Kolhapur › प्रदूषणाने बालकांचे मेंदू निकामी होण्याचा धोका?

प्रदूषणाने बालकांचे मेंदू निकामी होण्याचा धोका?

Published On: Dec 07 2017 8:45AM | Last Updated: Dec 07 2017 8:45AM

बुकमार्क करा

राजेंद्र जोशी

कोल्हापूर ः आरोग्य विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये हवेतील वाढते प्रदूषण श्‍वसनाच्या विकाराला आमंत्रण देत असल्याचे संशोधनाअंती स्पष्ट झाले असले, तरी आता वाढत्या प्रदूषणाने लहान बालकांचा मेंदू कायमस्वरूपी निकामी होऊ शकतो, असे नवे संशोधन पुढे आले आहे.

जागतिक स्तरावर या संशोधनाकडे लक्ष वेधणारा एक अहवाल संयुक्‍त राष्ट्र बाल कल्याण निधी (युनिसेफ)या संस्थेने मंगळवारी प्रसिद्ध केला.  या अहवालाने भारतातील प्रदूषणाच्या
वाढत्या पातळीकडे लक्ष वेधले असून भारतातील नव्या पिढीपुढे असलेला हा धोका दूर करण्याचे राज्यकर्त्यांपुढे नवे आव्हान उभे राहिले आहे. भारतात हवेच्या प्रदूषणाची पातळी झपाट्याने वाढते आहे. वाहनांची वाढती संख्या, प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसविण्याची नवी मानसिकता यामुळे देशातील महानगरे प्रदूषणाच्या गंभीर विळख्यामध्ये अडकली आहेत. विशेषतः देशाची राजधानी असलेल्या दिल्ली आणि सभोवतालच्या परिसरामध्ये हा धोका शिखर पातळीपर्यंत पोहोचला आहे.

हिवाळ्यात धुके पसरावे, अशारीतीने प्रदूषणाचे काळे ढग राजधानीवर आच्छादले जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्किल होऊ लागले आहे. या पार्श्‍वभूमीवर या अहवालाने धोक्याची घंटा वाजविण्यास सुरुवात केली असून याकडे राज्यकर्त्यांसह प्रदूषणास कमी- अधिक प्रमाणात हातभार लावणार्‍या नागरिकांनी गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर जागतिक नकाशावर सर्वाधिक तरुणांचा देश म्हणून उभा राहू पहात असलेल्या भारतातील तरुण पिढी प्रदूषणाच्या दुलईमध्ये लपेटू शकते.

‘हवेतील धोके’ या शीर्षकाने प्रसिद्ध झालेल्या या अहवालात हवेतील प्रदूषणामुळे लहान बालकांच्या मेंदूवर कशाप्रकारे परिणाम होतात, याचे विस्तृत विवेचन करण्यात आले आहे. हवेतील प्रदूषणकारी घटक श्‍वसनावाटे मेंदूमध्ये सूज निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात. यामुळे मेंदूचे विषारी घकांपासून रक्षण करण्यासाठी रक्‍त आणि मेंदू यांच्या दरम्यान असलेला अत्यंत नाजूक पटल निकामी होतो. शिवाय, हवेतील मॅग्‍नेटाईटसारखे घटक मेंदूमध्ये तणाव निर्माण करून मेंदूच्या विकारांना आमंत्रण देत असल्याकडेही या अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे. ‘युनिसेफ’ने याविषयी सखोल संशोधन केले आहे. वाहनातील धुरापासून निघणारी कार्बन संयुगे (पॉलिसायक्‍लिक अ‍ॅरोमॅटिक हायड्रोकार्बन्स) मेंदूतील
पांढर्‍या पदार्थाला (व्हाईट मॅटर) इजा पोहोचण्यासही कारणीभूत ठरत असल्याचे संशोधकांचे मत आहे.