होमपेज › Kolhapur › शालेय  समित्यांसाठीही  राजकीय ‘मळमळ’

शालेय  समित्यांसाठीही  राजकीय ‘मळमळ’

Published On: Feb 07 2018 2:21AM | Last Updated: Feb 07 2018 12:54AMहमीदवाडा : मधुकर भोसले

कागलच्या राजकीय विद्यापीठात विद्येचे प्रांगणही राजकीय परिघापासून दूर राहिले नाही. सरस्वतीच्या या पवित्र दरबारात देखील शालेय व्यवस्थापन समिती आपल्याच गटाच्या ताब्यात राहावी यासाठी डावपेच आखले जाताहेत ही दुर्दैवाची बाब आहे. वेदगंगा काठावरील एका गावातील शालेय समितीचे मानापमान नाट्य चांगलेच रंगले आहे.त्यानिमित्ताने शाळेबाबतची तळमळ नव्हे तर राजकीय मळमळ अधोरेखित झाली आहे.

खरे तर शालेय गुणवत्ता वाढीस लागावी, शिक्षकांच्यावर सकारात्मक नियंत्रण रहावे या हेतूने या समित्यांची नवी रचना पद्धती राज्यशासनाने 6 वर्षांपूर्वी अमलात आणली. यामध्ये ज्या 
पालकांची मुले शाळेत शिकतात त्याच नागरिकांना समितीमध्ये सहभागी करण्याचा महत्त्वाचा निर्णय झाला; पण कागलमधील अनेक गावांतील हुशार राजकीय कार्यकर्त्यांनी यातही राजकारण आणलं.पालकांच्या मनात असो अथवा नसो पण माणसे शोधून अगदी मतदानापर्यंत मजल गेली. येथील काही शाळांमध्ये पोलिस बंदोबस्तात मतदानही झाले आहे. त्याचप्रमाणे अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी सहकारी संस्थाप्रमाणे सदस्य खेचण्याचे प्रकार झाले आहेत. 

खरे तर शिक्षण क्षेत्राशी काडीमात्र देणे घेणे नसणारे हुल उठवून नेमके या निवडींमध्ये सक्रिय होतात. यामध्ये शालेय गुणवत्ता म्हणजे काय व त्यासाठी काय केले पाहिजे या बाबी दूरच राहतात. समिती आमची व तुमची (म्हणजे आमच्या गटाची तुमच्या गटाची) असे शब्द ऐकायला मिळतात. अन्य ठिकाणचा हा राजकीय भेद इथे आणण्याची गरज नाही पण मग कागलचे राजकारण कसले ? 
गट एकत्र येऊन अध्यक्ष पदाचा कालावधी ठरवतात व नंतर तो पाळला जातो कधी जात नाही मग पुन्हा सारी राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली जाते. खरे तर इतकी आत्मियता शाळेसाठी लावली तर शाळांची गुणवत्ता वाढेल,विद्यार्थी संख्या वाढेल.काही गावांमध्ये असा प्रयोग झाला आहे; पण ही संख्या वाढण्याची गरज आहे.

अशीही एक समिती... 

या राजकीय कोलाहलातही काही गावांत मात्र शाळेप्रति निष्ठा ठेऊन समित्या स्थापन झाल्या आहेत. गलगले येथील दोन्हीही समित्यांच्या  निवडी बिनविरोध झाल्या. समिती निवड होताना या गावकर्‍यांनी मेतके येथून काही मुले शाळे येतात म्हणून त्या गावासाठी देखील 1 सदस्य दिला. तसेच बिनविरोध निवडलेल्या या सर्व सदस्यांनी प्रत्येकी 2100 रुपयांची देणगी शाळेस दिली शिवाय नंतर शाळेच्या शैक्षणिक उठावात 1 लाख 30 हजारांचा निधी समिती व शिक्षकांनी ग्रामस्थ व परगावी असणारे भूमिपुत्र यांच्याकडून गोळा केला. परिणामी तालुक्यातील एक आदर्श शाळा म्हणून या शाळेकडे पाहिले जाते. सर्वच वर्ग डिजिटल क्लासरूम बनले आहेत.