Mon, Aug 19, 2019 11:37होमपेज › Kolhapur › बैठ्या कमाईसाठी अनेकजण इच्छुक

बैठ्या कमाईसाठी अनेकजण इच्छुक

Published On: Feb 16 2018 1:52AM | Last Updated: Feb 16 2018 12:04AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

पोलिस ठाण्याकडे येणार्‍या चारित्र्य पडताळणी, पासपोर्टची कागदपत्रे पडताळणीसाठी येणार्‍या सामान्य नागरिकांकडून पैसे उकळण्याची वृत्ती वाढली आहे. 

बुधवारी तीनशे रुपयांची लाच घेताना चंदगड पोलिस ठाण्याची महिला पोलिस लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात अडकली. सहा महिन्यांपूर्वी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात पंधराशेची लाच घेताना कर्मचारी सापडला होता. या घटनांवरुन पोलिस ठाण्यातील बैठ्या कमाईची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे.

चारित्र्य पडताळणी दाखला, पासपोर्टसाठीची कागदपत्रे पडताळणी यासाठी अनेकांना घाईगडबड असते. पोलिस ठाण्यात वारंवार चकरा मारव्या लागू नयेत यासाठी सर्वसामान्य प्रयत्न करत असतात. आणि याचाच फायदा काही कर्मचारी घेत आहेत. ‘तुमचे काम एकाच फेरीत संपवतो‘ असे सांगून खुलेआम पैशाची मागणी केली जाते. तर शंभर, दोनशे रुपयांसाठी कशाला लांबडअशा भावनेतून नागरीकही पैसे देतात. यामुळेच गोपनीय विभागाकडे काम करण्यासाठी अनेकजण इच्छुक असतात. 

काम वाढलेले पासपोर्ट पडताळणीसाठी येणार्‍या कामांची संख्या कमालीची वाढली आहे. दररोज 30 ते 40 प्रकरणांची निर्गत प्रत्येक पोलिस ठाण्याला करावी लागते. पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आंदोलने, मोर्चे, बंदोबस्त अशी कामे सांभाळून पोलिसांना पासपोर्ट व्हेरीफिकेशन, चारित्र्य पडताळणीचे दाखले द्यावे लागतात. 

देशात अव्वल पण....
पासपोर्ट पडताळणीची संख्या पाहता सर्वाधिक वेगाने काम करण्यात कोल्हापूर जिल्हा देशात आघाडीवर आहे. पोलिस महानिरीक्षक व अधीक्षकांच्या प्रयत्नांमुळे कोल्हापूरचे नाव मोठे झाले. पण कर्मचार्‍यांच्या चिरीमिरी मागण्याच्या या प्रकारांनी या कामाला हरताळ फासण्याचे काम केले. 

एजंटांची साखळी
पोलिस ठाण्याकडे येणार्‍या नागरीकांना अर्ज भरण्याची माहिती अपुरी असते. अशावेळी मदत करण्याच्या नावाने पोलिस ठाण्याच्या आवारात वावरणार्‍या काही एजंटांकडून यासाठी पैशाची मागणी होते. 50 ते 60 रुपयांपासूनची रक्कम काम पूर्ण होईपर्यंत 200 ते 250 च्या घरात जाते. ही साखळी मोडून काढण्याची गरज आहे. 

पैसे मागितल्यास तक्रार करा : पोलिस अधीक्षक
पासपोर्टसाठीची कागदपत्रे पडताळणी किंवा चारित्र्य पडताळणीचे काम पोलिस ठाण्यातूनच करून घ्यावे लागते. याचा गैरफायदा काही पोलिस कर्मचार्‍यांकडून घेतला जात असेल तर नागरिकांनी वरिष्ठ अधिकार्‍यांकडे तक्रार करावी. पोलिस ठाण्यातील कोणत्याही कामासाठी पैसे देण्याची गरज नाही. तक्रार आल्यास तत्काळ कारवाई केली जाईल, असे पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी सांगितले.