Mon, Aug 19, 2019 11:56होमपेज › Kolhapur › जिल्ह्यातील पोलिस होणार ‘स्मार्ट’?

जिल्ह्यातील पोलिस होणार ‘स्मार्ट’?

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : दिलीप भिसे

आता जिल्ह्यातील पोलिस आणि पोलिस ठाणीही ‘स्मार्ट’ होणार आहेत. याअंतर्गत सर्वच पोलिस ठाण्यांचे कामकाज संगणकीकृत करण्यावर भर देण्यात येणार आहे. असे असले तरी वाढलेली गुन्हेगारी, बारगळलेले तपास, उत्साहात सुरू केलेल्या आणि तितक्याच वेगाने गुंडाळलेल्या योजनांचे काय? असा सवालही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. सायकलवरून गस्त, निर्भया पथकाच्या पंक्तीत ही ‘स्मार्ट’ योजना जाऊन बसणार नाही ना, अशी शंकाही उपस्थित केली जात आहे.  

सातारा जिल्ह्यापाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा स्मार्ट करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. स्मार्ट पोलिस ठाण्यांतर्गत पोलिस अधीक्षक, उपअधीक्षक कार्यालयासह जिल्ह्यातील सर्वच 31 पोलिस ठाण्यांचा चेहरामोहरा  बदलण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे.या उपक्रमांतर्गत  प्रयत्नही सुरू झाले आहेत.

 ‘सौजन्य’ अपलोड होईल का?
स्मार्ट पोलिस ठाण्यांतर्गत तंत्रज्ञानात सीसीटीव्ही यंत्रणा, सीसीटीएनएस प्रणालीच्या अनुषंगाने आवश्यक संगणक प्रणाली, जीपीएस प्रणालीयुक्त वाहने, स्मार्टफोन, प्रिंटर, झेरॉक्स, फॅक्स, स्कॅनर मशिनचा अंतर्भाव आहे. या प्रणालीसह अधिकारी, कर्मचार्‍यांचे समाजातील विविध घटकांशी संबंध, त्यांचे वर्तन, वाहतूक नियमनातील सुसूत्रता, उपाययोजनांचाही त्यात समावेश आहे. या संगणक प्रणालीत सौजन्यही अपलोड करावे, म्हणजे सर्वसामान्यांना पोलिसांची धास्ती वाटणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

अनंत अडचणी, सुविधांची आभाळ
 प्रत्यक्षात अधिकारी, पोलिसांना भेडसावणार्‍या अडचणी, इमारतीसह जागेचा तुटवडा, मूलभूत सोयी-सुविधा, पोलिस ठाण्यांतर्गत लॉकअप, संशयितांची सुरक्षितता, गरजेनुसार वाहन उपलब्धता, महिलांसाठी स्वतंत्र  स्वच्छता, विश्रांतीगृहे, जप्त  मालमत्तांच्या सुरक्षिततेसाठीही पावले उचलणे गरजेचे ठरणार आहे. 

लाखमोलाच्या वाहनांना गंज !
जिल्ह्यातील हातावर मोजण्याइतपत पोलिस ठाण्यांना अद्ययावत व पुरेशी जागा उपलब्ध आहे. बहुतांशी पोलिस ठाण्यांचा कारभार अपुर्‍या जागेत चालतो. गुन्ह्यात  हस्तगत केलेली वाहनेही पोलिस ठाण्यांच्या आवारात अस्ताव्यस्त पडलेली असतात. लाखमोलाच्या शेकडो वाहनांना गंज चढला आहे. 

सर्वसामान्यांशी उद्धट वर्तन!
 कामानिमित्ताने पोलिस ठाण्यात येणार्‍यांना किमान ज्येष्ठांसाठी तरी बैठकीची व्यवस्था असणे स्वाभाविक आहे. मात्र, बहुतांशी पोलिस ठाण्यात हे चित्र दिसून येत नाही. 


  •