होमपेज › Kolhapur › इचलकरंजीत आरबोळे टोळीला ‘मोका’

इचलकरंजीत आरबोळे टोळीला ‘मोका’

Published On: Apr 24 2018 1:27AM | Last Updated: Apr 24 2018 1:10AMइचलकरंजी : प्रतिनिधी

दरोडा, जबरी चोरीसारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या उमेश आरबोळेच्या ‘उम्याभाई गँग’वर गावभाग पोलिसांकडून ‘मोकां’तर्गत कारवाई करण्यात आली. पोलिसांनी उमेश भाऊसो आरबोळे (वय 26), संजय बापूसोा तारदाळे (37), शौकत इकबाल आरकाटे (27), अर्जुन आप्पासाहेब रानभरे (24), राजू महादेव आरबोळे, चंद्रशेखर नामदेव नाईक (43) या टोळीवर ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी दिली. गडहिंग्लज विभागांतर्गत ‘मोका’ची ही कारवाई आहे.

उम्याभाई टोळीने कट रचून शिवानंद धोंडिराम कुंभार (रा.शिरदवाड) याला बेदम मारहाण करून 1,200 रुपये हिसकावून घेतले होते. याप्रकरणी गावभाग पोलिस ठाण्यात उमेश आरबोळे, संजय तारदाळे, शौकत आरकाटे, अर्जुन रानभरे, राजू आरबोळे, चंद्रशेखर नाईक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात राजू आरबोळेवगळता सर्व आरोपी सध्या न्यायालयीनकोठडीत आहेत. आरबोळे टोळीची दहशत वाढतच चालल्यामुळे या टोळीविरोधात ‘मोकां’तर्गत कारवाई करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला आज विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी मान्यता दिली.

टोळीचा म्होरक्या उमेश आरबोळे याच्यावर  दरोडा, जबरी चोरीसह 10 गंभीर गुन्हे, तर 6 अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत. संजय तारदाळेवर 6 गुन्हे दाखल आहेत. या टोळीने दहशत माजविणे, बालकांवर लैंगिक अत्याचार, अवैध दारू विक्री, जुगार यासारखे गुन्हे केले होते. त्यामुळे या टोळीविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 चे कलमानुसार प्रस्ताव पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला आज मंजुरी मिळाल्याचे श्रीनिवास घाडगे यांनी सांगितले. अधिक तपास जयसिंगपूरचे उपविभागीय अधिकारी कृष्णात पिंगळे करीत आहेत. पत्रकार परिषदेस उपअधीक्षक विनायक नरळे, पोलिस निरीक्षक मनोहर रानमाळे, सतीश पवार उपस्थित होते.

Tags : Kolhapur, Police, took, action, under, Moka rule