होमपेज › Kolhapur › माजगाव ग्रामपंचायत मासिक सभेला पोलिस, स्ट्रायकिंग फोर्स तैनात

माजगाव ग्रामपंचायत मासिक सभेला पोलिस, स्ट्रायकिंग फोर्स तैनात

Published On: Jun 01 2018 2:05AM | Last Updated: May 31 2018 10:20PMतुरंबे : वार्ताहर 

माजगाव (ता. राधानगरी) ग्रामपंचायतीची मासिक सभा गुरुवारी पोलिस बंदोबस्तात पार पडली. येथील उपसरपंच मोहन चौगले हे निवडून एका गटातून आले आणि उपसरपंच झाल्यानंतर विरोधी गटात गेल्याने 22 मे रोजी मासिक सभेत वाद झाला होता. गुरुवारी पुन्हा पोलिस बंदोबस्तात मासिक सभा पार पडली. यामध्ये गावातील वातावरण तणावाचे झाले होते. यावेळी गावात एक स्ट्रायकिंग फोर्स आणि राधानगरीचे पोलिस तैनात केले होते. 

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत हिंदुराव पाटील गटाला  5 सदस्य आणि सरपंच पद मिळाले होते तर राष्ट्रवादीच्या अशोक चौगले गटाला 4 जागा मिळाल्या होत्या. पाटील गटातून मोहन चौगले हे विजयी झाले होते. यानंतर ते विरोधी अशोक चौगले यांच्या राष्ट्रवादीच्या गटात गेले, याचा राग पाटील गटाला होता. ग्रामपंचायतीची मासिक सभा 22 मे रोजी होती. यावेळी पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी उपसरपंच चौगले यांना मासिक सभेला उपस्थित राहण्यास विरोध केला. प्रभाग 1 मध्ये त्यांचे स्वत:चे मत सद्धा नाही; मात्र त्यांना आम्ही निवडून आणल्याचे पाटील यांनी सांगितले. नंतर ते विरोधी गटात गेले, यातून दोन गटांत जोरात मारामारी झाली आणि राधानगरी पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या. त्यामुळे ही मासिक सभा तहकूब करण्यात आली आणि गुरुवारी मोठ्या पोलिस बंदोबस्तात मासिक सभा घेतली.

यावेळी ग्रामसेवक रोहिदास चौगले यांनी अहवाल आणि आलेल्या अर्जांचे वाचन करून विकास कामांचा आढावा घेतला. गावाच्या विकासासाठी सर्व सदस्यांनी संघटित होऊन काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. मासिक सभेला पोलिस बंदोबस्त आणि स्ट्रायकिंग फोर्स बोलवावा लागतो हे तालुक्यातील पहिलेच गाव आहे. यासंदर्भात हिंदुराव पाटील म्हणाले, गावात दिवसभर पोलिस निरीक्षक अशोक इंदुलकर यांच्या उपस्थितीत बंदोबस्त तसेच स्ट्रायकिंग फोर्स तैनात केला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी विशेष लक्ष दिले.