Sat, Mar 23, 2019 02:44होमपेज › Kolhapur › जिल्ह्यातील पोलिस ७२ तास रस्त्यावर

जिल्ह्यातील पोलिस ७२ तास रस्त्यावर

Published On: Jul 19 2018 1:37AM | Last Updated: Jul 19 2018 1:15AMकोल्हापूर : प्रतिनिधी

दूध आंदोलन आणि पूरस्थितीने जिल्ह्यात गंभीर स्वरुप धारण केल्याने रविवारीपासून तब्बल 72 तास वरिष्ठ अधिकार्‍यांसह पोलिस रस्त्यावर आहेत. शिरोळसह हातकणंगले, पन्हाळा, शाहूवाडी, गडहिंग्लज तालुक्यात रात्र-दिवस जागता पहारा ठेवण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांसह स्थानिक साडेचारशेवर पोलिस, शिवाय राज्य राखीव दलाचे दोनशे जवान पाचारण करण्यात आले आहेत.

दूध दरवाढ आंदोलनाला शहरासह जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सरकारच्या नाकर्तेपणावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत दूध वाहतूक करणार्‍या टँकरवरील दगडफेकीसह पेटवून देण्याचे प्रकार सुरू केले आहेत. सांगली-कोल्हापूर मार्गावरील उमळवाड फाट्यासह कोल्हापूर रस्त्यावरील दोन घटनांमुळे जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.
सांगली फाटा, लक्ष्मी टेकडी, हातकणंगले, जयसिंगपूर, पेठवडगाव, उदगाव, शिरोळ,कुरुंदवाड, हेरवाड, वारणानगर परिसरात संततधार पावसातही पोलिसांचा फौजफाटा सज्ज ठेवण्यात आला आहे. दूध आंदोलनाची तीव्रता वाढत असतानाच जिल्ह्यात पूरस्थितीही अधिक गंभीर बनत आहे.

जिल्ह्यात पंचगंगा, कृष्णा, वारणा, कुंभी, कासारी, वेदगंगा, दूधगंगासह अन्य नद्यांच्या पाण्याच्या पातळीत दोन दिवसांपासून कमालीची वाढ होत राहिल्याने नदीकाठावरील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी जिल्हा प्रशासनासह पोलिस यंत्रणेचीही तारांबळ उडाली आहे.

पोलिस अधीक्षक संजय मोहिते,अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, श्रीनिवास घाटगे यांनी काही संवेदनशील गावांचा मंगळवारी रात्री उशिरा तसेच बुधवारी सकाळी संपर्क दौरा केला. शिरोळ, हातकणंगले तालुक्यातही यंदा पूरस्थिती गंभीर आहे. त्यामुळे पोलिस दलामार्फत विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. दूध आंदोलनाचे केद्रस्थान असलेल्या या दोन तालुक्यांत आंदोलकांच्या हालचालींवर
पोलिस यंत्रणेने लक्ष केंद्रित केले आहे.

पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, सहायक निरीक्षक शहाजी निकम यांच्यासह पंधरा अधिकार्‍यांसह दीडशेवर पोलिसांचा 72 तासांपासून जागता पहारा आहे. टँकर पेटविण्याच्या दोन घटना वगळता अन्य कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे सांगण्यात आले.