होमपेज › Kolhapur › पोलिसपाटील, कोतवाल, आशा स्वयंसेविकांच्या मानधनात  वाढ

पोलिसपाटील, कोतवाल, आशा स्वयंसेविकांच्या मानधनात  वाढ

Published On: Jun 25 2018 1:47AM | Last Updated: Jun 25 2018 12:47AMकोल्हापूर : प्रतिनिधी

राज्यातील पोलिसपाटील, कोतवाल व आशा स्वयंसेविका यांच्या मानधनांत लवकरच वाढ होणार आहे. याबाबत नेमलेल्या एकछत्री समितीचा अहवाल राज्य शासनाला सादर करण्यात आला असून, त्यात मानधनवाढीची शिफारस करण्यात आली आहे. या अहवालावर शासन सकारात्मक असल्याचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी भेटीप्रसंगी सांगितल्याची माहिती आ. प्रकाश आबीटकर यांनी दिली.

आ. आबीटकर म्हणाले, राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिस यंत्रणा करत असते. परंतु, स्थानिक स्तरावरचे तंटे मिटविण्याचे महत्त्वाचे काम पोलिसपाटील करतात. मात्र, त्यांना नाममात्र मानधन मिळते. त्यात वाढ होणे आवश्यक होते. कोतवाल व आशा स्वयंसेविका यांच्याही मानधनामध्ये वाढ करावी, या मागणीसाठी दोन वर्षांपासून पाठपुरावा केला जात होता. पोलिसपाटलांच्या मानधन वाढीबाबत गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासमवेत मंत्रालयात बैठक झाली होती. मात्र, मानधन वाढीचा निर्णय न झाल्याने 31 जुलै 2017 रोजी संघटनेने आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन केले होते. या आंदोलनास केसरकर यांच्यासमवेत आपण भेट दिली, त्यावेळीही केसरकर यांनी मानधन वाढीबाबत शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले होते.

या पार्श्‍वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लक्षवेधी उपस्थित केली होती. त्यावेळी केसरकर यांनी मानधनवाढीबाबत समिती स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार एकछत्री समितीची स्थापना केली. या समितीने आपला स्वयंस्पष्ट अहवाल शासनाला सादर केला आहे. हा अहवाल प्रधान सचिव महसूल मनुकुमार श्रीवास्तव, राज्याचे मुख्य सचिव डी. के. जैन यांच्याकडून महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्याकडे प्राप्त झाला. या पार्श्‍वभूमीवर पोलिसपाटील संघटनेच्या प्रतिनिधींसमवेत त्यांची भेट घेतली. मानधन वाढीबाबतची वस्तुस्थिती सांगितल्यानंतर राठोड यांनी हा अहवाल स्वीकारण्याबाबत फाईलवर तत्काळ स्वाक्षरी केल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी संघटनेचे राज्य सचिव कमलाकर मांगले, योगेश पाटील, रवींद्र पवार, धनाजी खोत, अवधूत परुळेकर आदी उपस्थित होते.