Wed, Apr 24, 2019 00:01होमपेज › Kolhapur › गुंडापुंडांचे दिवस भरले!

गुंडापुंडांचे दिवस भरले!

Published On: Mar 24 2018 1:48AM | Last Updated: Mar 23 2018 10:38PMकोल्हापूर : दिलीप भिसे

दोन दशकांपासून प्रतीक्षेतील ‘कोल्हापूर पोलिस आयुक्‍तालय’ कार्यान्वित होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरात लवकरच पोलिस आयुक्‍तालय सुरू होईल, अशी घोषणा केल्यामुळे सर्वच घटकातून उत्स्फूर्त स्वागत होत असतानाच दुसरीकडे मात्र फाळकूटदादा, दहशत माजविणार्‍या समाजकंटकांसह सावकार, काळेधंदेवाले, तस्करी टोळ्या धास्तावल्या आहेत. समाजकंटकाविरुद्ध कारवाईचे सर्वाधिकार पोलिस आयुक्‍तांकडे असल्याने भविष्यात समाजविघातक टोळ्यांचे कंबरडे मोडणार हे निश्‍चित मानले जात आहे.

गुन्हेगारी टोळ्यांवर ‘वॉच’

परिक्षेत्रांतर्गत शहर, इचलकरंजीसह परिसरातील तेराही पोलिस ठाण्यांची रचना, लोकसंख्या, गुन्ह्यांचे प्रमाण, अधिकारी, कर्मचार्‍यांची लेखाजोखा, गुंड टोळ्यांतील साथीदारांच्या कारनाम्यांची कुंडलीही तयार करण्यात आली आहे. पोलिस आयुक्‍तालयाची घोषणा झाल्यास समाजकंटकांचे कंबरडेच मोडणार आहे हे निश्‍चित... सामाजिक स्वास्थ्यासाठी पोलिस आयुक्‍तालय होणे गरजेचे बनले होते.

कोल्हापूरसह इचलकरंजी, शहापूर,करवीर, शिरोली एमआयडीसी, हातकणंगले, हुपरी पोलिस ठाण्यांतर्गत गुन्हेगारीचा टक्‍का वाढल्याचेच दिसून येते. शहरासह ग्रामीण भागातील फोफावणारी गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न होत असले तरी पोलिस दलातील अपुर्‍या मनुष्यबळामुळे हे प्रयत्न तोकडे पडत असल्याचे दिसून येत होते. पोलिस आयुक्‍तालय कार्यक्षेत्रात हे अधिकार पोलिस आयुक्‍तांकडे असल्याने एमपीडीए, तडीपार, प्रतिबंधात्मक कारवाईसह संघटित गुंड टोळ्या, दारू, नरक्या, नाफ्ता तस्करीसह सावकारी, फाळकूट दादावर पोलिस आयुक्‍ता दणका देऊ शकतात. शस्त्रांसह हॉटेल व अन्य परवान्यांचेही अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. कायदा उल्लंघनाचा प्रयत्न झाल्यास दोषीवर बडगा उगारला जाऊ शकतो.

Tags : Kolhapur, Kolhapur News, Police commissioner office, soon Kolhapur