Sun, Jul 21, 2019 01:51होमपेज › Kolhapur › सोन्याचे दागिने लंपासप्रकरणी पोलिसासह तिघांवर गुन्हा दाखल

सोन्याचे दागिने लंपासप्रकरणी पोलिसासह तिघांवर गुन्हा दाखल

Published On: Feb 08 2018 1:44AM | Last Updated: Feb 08 2018 1:06AMपेठ वडगाव : वार्ताहर

वडगाव पोलिसांनी जप्‍त केलेल्या तीन किलो सोन्यापैकी अर्धा किलो सोन्याचे दागिने लंपास केल्याप्रकरणी एका पोलिसासह पोलिसमित्र व त्याच्या चालकावर वडगाव पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा नोंद झाला. या प्रकाराने पोलिस यंत्रणेत खळबळ उडाली आहे.

दोन दिवसांपूर्वी पोलिसमित्र अनिल डोईफोडे (रा. घुणकी) याने पोलिस हवालदार संदीप मगदूम याच्याकडे गावठी कट्टा बाळगलेल्या एकाबाबत संशय व्यक्‍त केला.

 त्याप्रमाणे संदीप मगदूम यांनी पाळत ठेवून आष्टा रोडवरील एकास पकडून पोलिस ठाण्यात आणले. दरम्यान, त्याच्याकडे असलेल्या बॅगमध्ये तीन किलो सोने असल्याचे निदर्शनास आले. त्याने हे सोने वडगाव येथील सराफ व्यापार्‍यांना नमुना म्हणून दाखवण्यासाठी आणले असल्याचे सांगितले. त्यानुसार त्याच्या आष्टा येथील सराफ मालकाला बोलावण्यात आले. हे सोने सराफाला विक्री करण्यासाठी नमुना दाखवण्यासाठी आणले असल्याचे निष्पन्‍न झाले. हा पंचनामा संदीप मगदूम यांच्या खोलीमध्ये सुरू असतानाच त्यातील काही सोने गायब झाल्याचे सराफाने सांगितले.

हे सोने कुठे गायब झाले, असा सवाल सराफाने पोलिसांना केला. तसेच सोने परत देण्याची मागणी केली. मात्र, ते आमच्याकडे नसल्याचे पोलिसांनी सांगितले. सकाळी पोलिसांकडून या सोन्याबाबत कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने सराफाने कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे धाव घेतली. या घटनेचे गांभीर्य ओळखून नांगरे-पाटील यांनी जिल्हा पोलिसप्रमुख संजय मोहिते यांना याबाबतची शहानिशा करण्याच्या सूचना केल्या.

मोहिते यांनी, तातडीने हे सोने कुठे गायब झाले याचा तपास करावा, असे आदेश दिले. यावेळी तिथे उपस्थित असलेले डोईफोडे व चालक अनुसे यांना सोने घेतले असल्यास परत करण्यास सांगितले. सायंकाळी डोईफोडे याच्या चालकाने हे सोने पोलिसांना परत केले. याबाबतची खात्री सराफाने दिल्याने या कटात हवालदार संदीप मगदूमसह अनिल डोईफोडे व अनुसे यांचा सहभाग असल्याचे पोलिस यंत्रणेने सांगितले. तसेच डोईफोडे याच्या मोबाईलवरील कॉल डिटेल्समध्ये मगदूम व डोईफोडे यांचा यासंदर्भातील संवाद असल्याने या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेतली. दरम्यान, जयसिंगपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी या प्रकरणाची सूत्रे हातात घेऊन पोलिस मगदूम, डोईफोडे व अनुसे यांच्यावर रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. या तिघांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक यशवंत गवारे करीत आहेत.a