Tue, Jul 07, 2020 22:01होमपेज › Kolhapur › वारणा चोरी; तीन गुन्ह्यांच्या एकत्र चौकशीसाठी सीआयडी हायकोर्टात

वारणा चोरी; तीन गुन्ह्यांच्या एकत्र चौकशीसाठी सीआयडी हायकोर्टात

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

वारणा चोरीप्रकरणी दाखल तीनही स्वतंत्र गुन्ह्यांची ‘सीआयडी’मार्फत एकत्रित चौकशी झाल्यास गुन्ह्याची व्याप्ती व संशयितांची साखळी उघड होण्याची दाट शक्यता आहे. शिवाय गुन्हासिद्धतेसाठीही योग्य फायदा होऊ शकतो. त्यामुळे तीनही गुन्ह्यांच्या संयुक्‍तिक तपासासाठी ‘सीआयडी’मार्फत हायकोर्टात धाव घेण्यात आलेली आहे, असे सीआयडीचे विशेष पोलिस महानिरीक्षक 
सुनील रामानंद यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले.

वारणा चोरीप्रकरणात वरिष्ठ अधिकार्‍यासह पोलिसांना अटक झाल्याने हे प्रकरण राज्यभर बहुचर्चित ठरले आहे. गुन्ह्यातील आरोपीविरुद्ध सीआयडीने भक्‍कम पुरावे उपलब्ध करून न्यायालयात सादर केले आहेत. असे स्पष्ट करून विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणाले, मुख्य संशयित मैनुद्दिन मुल्लाने साथीदाराच्या मदतीने केलेल्या चोरीच्या मूळ गुन्ह्याचा तपास कोल्हापूर पोलिस दलाकडे आहे. दि.13 व 15 मार्च 2016 मध्ये पोलिस अधिकारी विश्‍वनाथ घनवट, सूरज चंदनशिवे व अन्य पोलिसांनी केलेल्या चोरीचा तपास सीआयडीकडे आहे.

वारणा शिक्षण मंडळाचे सचिव जी. डी. पाटील व फिर्यादी झुंझारराव सरनोबत यांच्या चौकशीच्या अनुषंगाने जनसुराज्य शक्‍ती पक्षाचे सरचिटणीस व प्रवक्‍ते विजयसिंह जाधव यांनी केलेली मागणी कोल्हापूर पोलिस दलाच्या अखत्यारीत आहे. मूळ गुन्ह्यांचा तपास सीआयडीकडे नाही. स्थानिक गुन्हे अन्वेषण व कोडोली पोलिस ठाण्यामार्फत चौकशी सुरू असल्याने झालेल्या मागणीबाबत भाष्य करणे योग्य नाही, असेही ते म्हणाले.

वास्तविक वारणा चोरीप्रकरणी तीन वेगवेगळ्या गुन्ह्याच्या स्वतंत्र चौकशीत तपास यंत्रणेवर मर्यादा येत असल्याने मूळ गुन्ह्यांचा तपासही सीआयडीकडे देण्याबाबत स्वत: सीआयडीने राज्य शासनासह मुंबई उच्च न्यायालयाकडे रीतसर मागणी केली आहे. एखाद्या गुन्ह्याचा तपास अन्य यंत्रणेकडे सोपविण्याबाबत हायकोर्टाला अधिकार आहेत. त्यामुळे भविष्यात काय निर्णय होतो हे पहावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.गुन्ह्यातील संशयित व निलंबित सहायक फौजदार शरद कुरळपकरला फरारी घोषित करून त्याच्या स्थावर मालमत्तेवर टाच आणण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. सूरज चंदनशिवे, शंकर पाटील व मुल्लाला झालेल्या जामिनाला वरिष्ठ न्यायालयात आव्हान देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत, असेही ते म्हणाले.

अनिकेत कोथळे खून खटला फास्टट्रॅक कोर्टात

सांगलीतील अनिकेत कोथळे खूनप्रकरणी मुख्य संशयित व निलंबित पोलिस अधिकारी युवराज कामटेसह अन्य पोलिसाविरुद्ध भक्‍कम पुराव्यासह दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सीआयडीने अत्यंत कौशल्याने तपासाची यंत्रणा राबवून पुरावे संकलित केले आहेत. हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालविण्याचे प्रयत्न आहेत. आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी पथकाने अथक परिश्रम घेतले आहेत, असेही रामानंद यांनी सांगितले.

‘सीआयडी’कडे आणखी गंभीर 9 गुन्ह्यांची चौकशी

सीआयडीच्या वार्षिक तपासणीसाठी आलेले विशेष पोलिस महानिरीक्षक रामानंद यांनी कोल्हापूर विभागांतर्गत कामकाजाचा आढावा घेतला. कोल्हापूर सीआयडीकडे वारणा चोरीसह अन्य नऊ गंभीर गुन्हे चौकशीसाठी सोपविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

अपुर्‍या मनुष्यबळामुळे तपास यंत्रणेवर मर्यादा

सीआयडीकडे सध्या उपलब्ध मनुष्यबळ तोकडे असल्याने तपास यंत्रणेवर मर्यादा येत आहेत. मनुष्यबळ वाढवून मिळण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी, अप्पर पोलिस अधीक्षक नरेंद्र गायकवाड, पोलिस उपअधीक्षक डी. डी. कांबळे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Tags : Kolhapur, Kolhapur News, Police, arrested, senior officials, Warna, crime case


  •