होमपेज › Kolhapur › सूरज्या-गोंद्या वाठारजवळ जेरबंद

सूरज्या-गोंद्या वाठारजवळ जेरबंद

Published On: May 22 2018 1:25AM | Last Updated: May 22 2018 12:43AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

शाहूवाडी पोलिस ठाण्यातील लॉकअप तोडून पळालेल्या सूरज सर्जेराव दबडे व गोविंद वसंत माळी या दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले. सोमवारी दोघेही वाठारपैकी साखरवाडीतील सूरज दबडेच्या घरी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. साखरवाडी - अंबप रस्त्यावर दोघांच्या मुसक्या आवळल्या. गेले तीन दिवस शाहूवाडी, कोडोलीतील डोंगराळ भागात आंबे, करवंदे खाऊन गुजरान केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.

दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, दुखापत अशा 34 गंभीर गुन्ह्यात सहभागी सूरज्या-गोंद्या गँगवर मोकाअंतर्गत कारवाई करण्यात येणार होती. या भितीने शाहूवाडी पोलिसांच्या ताब्यात असताना शुक्रवार, 18 रोजी पहाटे सूरज सर्जेराव दबडे (वय 22, रा. वाठारपैकी साखरवाडी), गोविंद वसंत माळी (19), ओंकार महेश सूर्यवंशी (19, दोघे रा. कासेगाव, वाळवा, सांगली), विराज गणेश कारंडे (वय 19, रा. दरवेश पाडळी, हातकणंगले) या चौघांनी लॉकअप तोडून पलायन केले होते. यापैकी ओंकार सूर्यवंशी व विराज कारंडे या दोघांना शनिवारी सकाळी घुणकी फाट्यानजीक पेठवडगाव पोलिसांनी अटक केली. तर टोळीचा म्होरक्या सूरज व गोविंद पसार झाले होते.

तीन दिवस गुंगारा

सूरज दबडे व गोविंद माळी या दोघांनी शुक्रवारी पहाटे शाहूवाडी पोलिस ठाण्याच्या आवारातील मोटारसायकल चोरून त्यावरून पलायन केले. या मोटारसायकलीचे पेट्रोल संपल्याने ती सरुड गावी सोडली. तिथून दुसरी मोटारसायकल चोरली. या मोटारसायकलवरुन दोघे कोडोलीमध्ये आले होते. जागोजागी पोलिसांची नाकाबंदी असल्याने दोघांनी डोंगराळ भागात वास्तव्य केले. 

आंबे, करवंदे खाऊन गुजरान

तीन दिवसांत संशयित आरोपींना गावात जाणे मुश्कील बनले होते. पोलिसांनी नऊ पथके मागावर असल्याने मिळेल त्या ठिकाणी करवंदे, जांभळे तसेच आंबे खाऊन दोघांनी गुजरान केल्याचे पोलिसांना सांगितले. दोघांचे जबरी चोर्‍यांचे रेकॉर्ड असल्याने याकाळात त्यांनी असे काही गुन्हे केले आहेत का, याचा तपास पोलिस करीत आहेत. 

साखरवाडीत सापळा रचला

सूरज दबडे याचे घर वाठारपैकी साखरवाडीमध्ये आहे. सोमवारी तो घरी येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक यशवंत गवारी यांना मिळाली होती. त्यांनी या रस्त्यावर सापळा रचला होता. साखरवाडी ते अंबप रस्त्यावर दोघांना ताब्यात घेण्यात आले. या कामगिरीमध्ये वडगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक यशवंत गवारी, बालाजी घोळवे, नंदू घुगरे, विकास माने, दादा माने, संदीप गायकवाड, विकास घस्ते, विजय गुरव, संतोष वायदंडे, बाळासाहेब दुकाने आदींनी परिश्रम घेतले.