Sat, Aug 24, 2019 23:28होमपेज › Kolhapur › पोलिस आयुक्‍तालयाला पुन्हा कोलदांडा

पोलिस आयुक्‍तालयाला पुन्हा कोलदांडा

Published On: Apr 11 2018 1:33AM | Last Updated: Apr 11 2018 1:22AMकोल्हापूर : दिलीप भिसे

कोल्हापूर पोलिस आयुक्‍तालयाच्या प्रस्तावाला शासनाने मंगळवारी पुन्हा कोलदांडा दिला. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाला झुकते माप देताना कोल्हापूर पोलिस आयुक्‍तालयाचा प्रस्ताव प्रलंबित ठेवल्याने करवीरवासीयांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आली आहे. कोल्हापूर पोलिस आयुक्‍तालयाचा प्रस्ताव दोन दशकांपासून प्रलंबित आहे. लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय स्तरावरही पोलिस आयुक्‍तालयासाठी पाठपुरावा सुरू आहे. गृहखात्याच्या आदेशानुसार प्रशासनाने वारंवार सुधारित प्रस्तावही शासनदरबारी सादर केले आहेत. पोलिस ठाण्यांच्या इमारतीसह पोलिस मुख्यालयासाठी कसबा बावडा येथील प्रशस्त जागेचा प्रस्तावही सादर करण्यात आला होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. 22 मार्च 2018 रोजी कोल्हापूर शहरासह पिंपरी-चिंचवड व मीरा भाईंदर पोलिस आयुक्‍तालयाच्या निर्मितीचा लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती विधानसभेत दिली होती. त्यामुळे कोणत्याही क्षणी कोल्हापूर पोलिस आयुक्‍तालयाची घोषणा होईल, अशीच सार्वत्रिक चर्चा होती.मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारामुळे जिल्हा प्रशासनाचीही धावपळ सुरू होती. कोल्हापूर शहरातील चार पोलिस ठाण्यांसह परिसरातील एकूण 13 पोलिस ठाण्यांचा आयुक्‍तालय क्षेत्रात अंतर्भाव करण्यात आला होता. पोलिस दलातील वाढत्या मनुष्यबळामुळे शहरासह ग्रामीण भागातील शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास मदत होईल. त्यामुळे सर्वसामान्यांसह पोलिस दलातही पोलिस आयुक्‍तालयाच्या घोषणेबाबत उत्सुकता होती.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोल्हापूर पोलिस आयुक्‍तालयाचा प्रश्‍न निश्‍चित मार्गी लागेल, अशी अटकळ सर्वांनीच बांधली होती. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पिंपरी-चिंचवडच्या पोलिस आयुक्‍तालयाला झुकते माप देताना कोल्हापूर पोलिस आयुक्‍तालयाचा प्रस्ताव प्रलंबित ठेवल्याने जिल्ह्यात नाराजीचा सुर उमटला आहे खंडपीठ मागणीपाठोपाठ पोलिस आयुक्‍तालया-बाबतही कोल्हापूरकरांच्या पदरी आणखी एकदा निराशा आली आहे.

Tags : Kolhapur, Police, Commissionerate, postponed