Thu, Jun 20, 2019 01:14होमपेज › Kolhapur › बिंदू चौक पार्किंगमध्ये प्रवाशांची लूट

बिंदू चौक पार्किंगमध्ये प्रवाशांची लूट

Published On: Jun 11 2018 1:06AM | Last Updated: Jun 10 2018 11:35PMकोल्हापूर : अनिल देशमुख

बिंदू चौकातील पार्किंगमध्ये प्रवाशांची लूट सुरू आहे. जादा तासाचे पैसे आकारले जातात. मात्र, त्याच्या पावत्या दिल्या जात नाहीत. या जादा पैशाच्या ‘कलेक्शन’साठी परिसरातील विक्रेत्यांची मदत घेतली जात आहे. गर्दीच्या वेळी दोन-तीन हजार रुपये परस्पर कमवले जात असल्याचीही चर्चा आहे.

कोल्हापुरात पर्यटक, भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. खासगी वाहनाने अंबाबाई दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची संख्येत दररोज भर पडत आहे. राज्यातीलच नव्हे तर शेजारच्या कर्नाटक, गोवा आदींसह गुजरात, आंध्र प्रदेश आदी राज्यांतूनही भाविक दर्शनासाठी येतात. दर्शनासाठी येणार्‍या भाविकांच्या वाहनांचे बिंदू चौकात पार्किंग केले जाते. 

बिंदू चौकातील पार्किंगचा यापूर्वी ठेका होता. तो बंद झाल्याने महापलिकेच्या परिवहन विभागाच्या (केएमटी) वतीने हे पार्किंगचे काम पाहिले जाते. परिवहन विभागातील कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी प्रवाशांची लूट केली जात आहे. पार्किंगचे दर तासावर ठरवण्यात आले आहेत. पार्किंग ठिकाणी प्रवेश करताना वाहनचालकाकडून पहिल्या तासाची रकमेची पावती देऊन ती रक्कम घेतली जाते. परत जाताना पावती पाहून तासापेक्षा जास्त वेळ झाला असेल तर त्यापुढील वेळेचेही पैसे आकारले जातात. जादा रकमेची आकारणी करताना त्याची पावती देणे बंधनकारक आहे. मात्र, तशी पावती अनेक वाहनधारकांना दिली जात नाही. गर्दीच्या वेळी तर बहुतांशी वाहने विनापावतीच पैसे देऊन पार्किंगमधून बाहेर पडतात.

जादा तासांची रक्कम आकारताना 20 आणि 25 रुपये असे दरच ठरवले आहेत. पहिली पावती पाहायची त्यावरची वेळ मोठ्याने ओरडून सांगायचे, आता अमूक वाजले म्हणायचे आणि थेट 20 रुपये द्या, 25 रुपये द्या असे वाहनधारकाला सांगायचे. तासावर दर आहेत, लिहिले आहे बघा असे त्यालाच समजावून सांगत, त्याच्याकडून जादा रक्कमेची वसूली करायची. कोणी पावती मागितली तरच त्याला द्यायची अन्यथा पहिली पाहण्यासाठी घेतलेली पावतीच परत हातात देऊन वाहन पुढे मार्गस्थ करा असे सांगायचे. यामुळे वाहनधारकही जादा रक्कमेविषयी अधिक चौकशी न करता पैसे देऊन तसेच पुढे जात असल्याने ‘लुटी’ धंदा जोरात सुरू आहे.

पार्कींगमध्ये जादा रक्कमेच्या वसूलीसाठी ‘मुजावर’ नावाचा विक्रेता कर्मचार्‍यांना मदत करत असतो. काही कर्मचारी ठराविक वेळाने त्याच्याकडेे शंभराची नोट देत असतात. चार-पाच गाड्याचे पैसे घेतल्यानंतर त्याची जमा होणारी ही एकत्रित रक्कम असते. काही वेळा तर हा स्वत: वाहनचालकांकडून पैसे वसुल करतो, त्याच्याकडे विचारणा केली तर आपण केएमटीचे कर्मचारी असल्याचे तो बिनधास्त सांगतो. कोणत्या पदावर काम करता, कामाचे स्वरूप काय असे काही तपशीलवार प्रश्‍न विचारल्यावर मात्र, तो त्याचे उत्तर देत नाही. अन्य कर्मचार्‍यांसारखा तुमचा गणवेश का नाही, असे आणखी काही खोलात जाऊन प्रश्‍न विचारले तर वर्कशॉप मध्ये असतो असे सांगतो. तिथे काय करता असे विचारता काहीही करत असतो, मला कोणतेही काम करावे लागते असे सांगत असतो. वास्तवात मात्र, तो या पार्कींग ठिकाणी डीव्हीडी सीडी विक्री करत आहे. दिवसभर जमा झालेली रक्कम नंतर संबधितांपर्यंत पोहोच करण्याचे कामही तो करत असल्याची या परिसरात चर्चा आहे.