Mon, May 20, 2019 18:09होमपेज › Kolhapur › बेदरकार टोळक्यांची मैदानांवरही दहशत!

बेदरकार टोळक्यांची मैदानांवरही दहशत!

Published On: Dec 16 2017 2:06AM | Last Updated: Dec 15 2017 11:58PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

पोलिसी खाक्या दुर्मीळ झाल्याने कायद्याची भीती नसलेल्या बेदरकार टोळक्यांचा वावर सर्वत्र वाढला आहे. शहरातील पेठापेठांतील वारसा जपणार्‍या तालीम-संस्थांच्या आणि राजकीय लोकप्रतिनिधींच्या नावाचा गैरवापर करून अशा टोळक्यांकडून मनाला येईल ते प्रकार बिनधास्त केले जात आहेत. तालीम-मंडळांचा परिसर, गल्ली-बोळ, शाळा-महाविद्यालयांच्या परिसरासह आता खेळाच्या मैदानांवरही अशा बेदरकार टोळक्यांची दहशत वाढली आहे. 

सक्षम-निर्व्यसनी भावी पिढी निर्माण व्हावी, यासाठी राजाश्रय आणि लोकाश्रयामुळे कोल्हापुरात  शतकोत्तर क्रीडा परंपरा विकसित झाली आहे. पारंपरिक खेळांसह आधुनिक खेळांसारखे प्रत्येक खेळ येथे आवडीने खेळले जातात. मूलभूत गोष्टींचा वाणवा असतानाही जिद्द-चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर येथे अनेक नामवंत खेळाडू नावारूपाला आले आहेत.  एकीकडे हे सकारात्मक चित्र असताना दुसरीकडे दादागिरी, गुंडगिरी, हुल्लडबाजीसह दारू-गुटखा-तंबाखुजन्य पदार्थांचे व्यसन करत ‘बापकमाई’सह गैरमार्गातून मिळविलेल्या पैशाची उधळपट्टी करणार्‍या तरुणांची हुल्लडबाज टोळकी निर्माण होत आहे.   

रहदारीच्या रस्त्यांवरच ठाण...  

आम्हाला कोण रोखणार? कोण कारवाई करतो? अशा अविर्भावात वाहतुकीचे नियम मोडून बेदरकार वाहने चालविणे, गल्ली-बोळातील प्रत्येक चौकात, रस्त्यांच्या दुतर्फा आपली वाहने कशीही अस्ताव्यस्त उभी करून तासन्तास उभे राहणे, रात्रभर दंगा-मस्ती करणे, कार डॉल्बीचा दणदणाट करणे, वाहतूक अडवून वाढदिवसांसारखे वैयक्तिक कार्यक्रम आयोजित करणे, मनाला येईल त्यावेळी रस्त्यावरच विविध खेळ खेळणे असे प्रकार सुरू असतात. अशा टोळक्यांना वाहन बाजूला घ्या, असे म्हणायची सोय नाही. कोणी म्हटलेच तर त्याच्या अंगावर धावून जाण्यासाठी सगळे सज्ज असतात. यामुळे अशा हुल्लडबाज टोळक्यांना रोखण्यासाठी पोलिसी खाक्याशिवाय पर्याय नसल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांतून निर्माण होत आहेत. 

मैदान परिसरात नाहक त्रास...

मैदानावर खेळणार्‍या खेळाडूंना नाहक त्रास देणे, सामने खेळणार्‍या,सराव करणार्‍या खेळाडूंना त्रास देणे, मैदानात दारूच्या बाटल्या फोडणे, गुटखा, मावा, पान खाऊन व्यायामाच्या ठिकाणी थुंकणे, नाहक कचरा करणे अशा गोष्टी या टोळक्यांकडून केल्या जात आहेत. एवढ्यावरच न थांबता लहान-लहान वयाच्या शालेय विद्यार्थ्यांनाही आपल्या टोळ्यात घेऊन व्यसनी बनविण्याचे प्रकार राजरोज सुरू असल्याचे वास्तव आहे. कामधंदा न करता चुकीच्या मार्गाने कमविलेल्या पैशातून चैन करत दिवस-रात्र ठिय्या मांडून बसलेल्या या टोळक्यांचा त्रास सर्वसामान्य लोकांना सहन करावा लागत आहे.