Wed, Jul 24, 2019 08:12होमपेज › Kolhapur › प्लास्टिकच्या पुनर्वापराला चालना देण्याची गरज

प्लास्टिकच्या पुनर्वापराला चालना देण्याची गरज

Published On: Mar 20 2018 1:48AM | Last Updated: Mar 20 2018 1:26AMकोल्हापूर : सुनील कदम

प्लास्टिक हे दैनंदिन जीवनातील एक आवश्यक घटक झालेले आहे. त्यामुळे बंदीऐवजी प्लास्टिकचा गैरवापर टाळणे आणि त्याचा पुनर्वापर हाच त्यावरचा तोडगा ठरू शकतो. त्यामुळे शासनानेही त्या अनुषंगाने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. प्लास्टिक प्रदूषणाचा सर्वाधिक विळखा पडला आहे तो जगभरामधील समुद्रांना. जगभरातील समुद्रांमध्ये असणार्‍या कचर्‍यापैकी जवळपास 90 टक्के कचरा हा प्लास्टिकचा आहे. हे प्रमाण इतके प्रचंड आहे की, जगात अनेक ठिकाणी समुद्रात प्लास्टिकची बेटेच्या बेटे तयार झाली आहेत. हे प्लास्टिक खाण्यात आल्यामुळे जगभरातील जलचरसृष्टी धोक्यात येत चालली आहे.

त्यामुळे अनेक देशांमध्ये प्लास्टिकच्या वापरावर वेगवेगळे निर्बंध आणि मोठ्या प्रमाणावर कर आकारणीसारख्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यातही प्रामुख्याने प्लास्टिकच्या गैरवापरावर निर्बंध आणि प्लास्टिकचा पुनर्वापर, यावरच भर दिलेला दिसून येतो. इटली, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, चीन, बांगला देश यासारख्या काही देशांनी सरसकट प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी लागू केली आहे. अन्य काही देशांनी प्लास्टिकचा वापर कमी करण्याच्या हेतूने प्लास्टिकच्या वापरावर मोठ्या प्रमाणात कर आकारणी लागू केली आहे. कचर्‍यातील प्लास्टिकचा वापर रस्तेबांधणीसाठी करणे, त्यापासून बांधकामाच्या विटा तयार करणे, वेगवेगळ्या प्रकारचे इंधन आणि तेल तयार करणे, असे काही पर्याय पुढे आलेले आहेत.

आपल्या देशात प्लास्टिकच्या या पुनर्वापराबाबत फारसे गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत नाही. ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था भयावह आहे. अशावेळी कचर्‍यातील प्लास्टिकचा वापर त्यासाठी होऊ लागल्यास प्लास्टिक कचर्‍याची समस्या मोठ्या प्रमाणात निकालात काढणे शक्य होणार आहे. देशात दररोज जवळपास पंधरा हजार टन प्लास्टिकचा कचरा तयार होतो. या कचर्‍यातील काही प्लास्टिकचा पुनर्वापर करून अन्य उत्पादने तयार करणारे जवळपास 15 हजार कारखाने आज देशात कार्यरत आहेत, अशा प्लास्टिक पुनर्वापर करणार्‍या उद्योगांना काही विशेष सवलती देण्याची आवश्यकता व्यक्‍त करण्यात येत आहे.

प्लास्टिक वापरावर निर्बंध लादताना जनजागृती करण्याचीही गरज आहे. बेजबाबदार प्लास्टिक वापरामुळे दरवर्षीच्या पावसाळ्यात मुंबईची ‘तुंबई’ होते आणि ती टाळता येणे सहजशक्य आहे,  याची तमाम मुंबईकरांमध्ये समज येण्याची गरज आहे. अमर्याद आणि बेजबाबदार प्लास्टिक वापरामुळे पर्यावरणाचे संकट ओढावलेले आहे, याचे भान प्रत्येकाने बाळगण्याची गरज आहे.
 

tags : Kolhapur,news,Plastic, recycling, solution,