Mon, Mar 18, 2019 19:17होमपेज › Kolhapur › कापडी पिशवी जवळ हवीच!

कापडी पिशवी जवळ हवीच!

Published On: Dec 24 2017 1:44AM | Last Updated: Dec 24 2017 12:36AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : विजय पाटील 

एक कॅरी बॅग द्या, असं रोज किमान पाच-सहा वेळा कोणाही नागरिकाच्या तोंडून सहज शब्द बाहेर पडतात. कारण आपले व्यवहार प्लास्टिकमय बनले आहेत. पण आता सहा महिन्यांत राज्य सरकार प्लास्टिकबंदी करणार आहे. पर्यावरणाच्या द‍ृष्टीने ही स्वागतार्ह बाब असल्याने आता प्रत्येकानेच एक कापडी पिशवी जवळ बाळगायला हवीच. 

जगभर प्लास्टिक बंदीची कार्यवाही सुरू झाली आहे. प्लास्टिक पिशव्यांनी तर सगळे देश त्रस्त आहेत. आपल्याकडे अशीच स्थिती आहे. कारण प्लास्टिक हे एक हजार वर्षांनंतरही नष्ट होत नाही. प्लास्टिकमुळे पर्यावरणाला धोका आहेच. तसेच पशु-पक्ष्यांची जैविक साखळीही यामुळे संकटग्रस्त बनली आहे. प्लास्टिक पोटात गेल्याने गायी-म्हैशींच्या मृत्यूंची संख्या वाढली आहे. शेतजमिनी नापीक बनल्या आहेत. जंगलांमध्येही प्लास्टिकच्या पिशव्या आणि पाण्याच्या बाटल्यांमुळे जमिनींवर नवीन झाडे उगवण्याचे प्रमाण घटले आहे. याचा परिणाम जंगलातील नैसर्गिकतेवर थेट होत आहे. एकूणच प्लास्टिकने जगभरात हाहाकार माजवला आहे. 

आता राज्यात सहा महिन्यांत प्लास्टिक बंदी घालणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. नागरिकांना प्लास्टिकची इतकी सवय झाली आहे की प्लास्टिक बंदीनंतर अनेकजण कदाचित अस्वस्थ होऊ शकतील. कारण कोणतीही वस्तू घेताना कॅरीबॅग ही बहुतेकांची सवय बनली आहे. सकाळी पिशवीतून येणार्‍या दुधापासून पिण्याच्या पाण्याच्या बाटलीपर्यंत जवळपास जगणं प्लास्टिकनं विणलं आहे.  त्यामुळे प्लास्टिक टाळण्याची सवय आतापासून लावली तर बंदीनंतर कसलाही त्रास जाणवणार नाही. त्यामुळे आतापासून एक कापडी पिशवीसोबत ठेवली तर कॅरीबॅगची गरज उरणार नाही.

प्लास्टिक पिशव्यांविषयी कानोसा

अमेरिका, चीन, इटली, बांगलादेश, दक्षिण आफ्रिकेत प्लास्टिक पिशव्यांवर  बंदी
इंग्लडमध्ये प्लास्टिक वापरासाठी शुल्क, आर्यलंडमध्ये प्लास्टिक पिशव्यांवर कर
डेन्मार्क व फ्रान्समध्ये प्लास्टिक पिशव्यांवर रिटेलर्ससाठी कर
मेक्सिकोत दुकानदारांना दंड, ऑस्ट्रेलियात पातळ पिशव्या वापरण्यावर बंदी

प्लास्टिक कचर्‍याचे स्वरूप

प्लास्टिक पिशवी, पाण्याची बॉटल, विविध खाद्यपदार्थांसाठी रॅपर, प्लास्टिकची भांडी आदींसह विविध वस्तूंसाठी प्लास्टिक वापरले जाते. यामुळे प्लास्टिकच्या कचर्‍यात मोठी वाढ दररोज होते.