Wed, Nov 21, 2018 08:03होमपेज › Kolhapur › कोल्हापुरात प्लास्टिक बंदी निर्णय कागदावरच 

कोल्हापुरात प्लास्टिक बंदी निर्णय कागदावरच 

Published On: Mar 25 2018 12:36AM | Last Updated: Mar 25 2018 12:31AMकोल्हापूर : प्रतिनिधी

राज्य शासनाने प्लास्टिक वापरावर बंदी घातली असली, तरी कोल्हापूर शहरात मात्र बंदी कागदावरच असल्याचे चित्र आहे. दररोज जमा होणार्‍या 180 टन कचर्‍यात तब्बल 10 टनांहून जास्त प्लास्टिकचा कचरा निर्माण होत आहे. शहरात सर्वत्र सर्रास प्लास्टिकचा वापर सुरू असल्याचे दिसून येते. त्यावर महापालिका प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होते. 

शहरात रोज जमा होणार्‍या प्लास्टिक कचर्‍यात प्लास्टिकच्या पिशव्या, थर्माकोलपासून तयार केलेले साहित्य, प्लास्टिकच्या बाटल्या आदींसह इतर साहित्याचा समावेश आहे. शहरातील प्लास्टिक वापरावर कोणाचेही बंधन नसल्याने किरकोळ विक्रेत्यांसह छोट्या व मोठ्या व्यावसायिकांकडून तब्बल दहा टनांपेक्षा अधिक हा कचरा रोज जमा होत आहे. हा कचरा लाईन बाजार येथील झूमच्या साईटवरच टाकला जात आहे. कचर्‍याचे विघटन होत नसल्याने अशाप्रकारे साठलेल्या कचर्‍याचा डोंगर झूमवर तयार झाला आहे. 

शहरात अनेक ठिकाणी प्लास्टिकच्या पिशव्यांसह इतर साहित्य व थर्माकोलचे साहित्य उघड्या गटारासह ड्रेनेजलाईनमध्ये टाकले जाते. त्यामुळे अनेकवेळा गटारी व ड्रेनेजलाईन तुंबतात. परिणामी, उघड्यावरून सांडपाणी वाहते. शहरातून बारा नाले वाहतात. यात जयंती नाला, दुधाळी नाल्यासह इतर नाल्यांचा समावेश आहे. नाल्यांतून वाहणार्‍या सांडपाण्यावर तर प्लास्टिकचे साहित्य तरंगत असते. जयंती नाल्यासह सर्वच नाल्यांची ही अवस्था आहे. त्यामुळे प्रदूषणात आणखीनच भर पडत आहे. 

Tags : Kolhapur,Kolhapur News, Plastic ban,decision, on paper, Kolhapur Munciple corporation