Thu, Apr 25, 2019 03:25होमपेज › Kolhapur › प्लास्टिक बंदी झाली; गुटखा बंदी फसली!

प्लास्टिक बंदी झाली; गुटखा बंदी फसली!

Published On: Apr 22 2018 1:16AM | Last Updated: Apr 21 2018 11:26PMकोल्हापूर : प्रतिनिधी

राज्य सरकारने प्लास्टिक बंदीचा नारा दिल्यापासून ग्राहक, सर्वसामान्य विक्रेते, व्यापारी अशा सर्वच वर्गात जनजागृती झाली आहे. दंड व कायद्याच्या बडग्याच्या भीतीने प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, गुटखा बंदीचा मात्र निर्णयाच्या पहिल्या दिवसापासून फज्जा उडला आहे. राज्य शासनाच्या प्लास्टिक बंदी निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी होईल की नाही, याबाबत सर्वांनाच साशंकता होती; पण कोल्हापूरसह छोट्या-मोठ्या शहरांतही प्लास्टिक वापरप्रश्‍नी कारवाईची मोहीम उघडण्यात आल्याने सर्वसामान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती झाली. 

मोठ-मोठ्या शॉपिंग मॉल्सबरोबरच छोट्या-मोठ्या व्यापर्‍यांनीही प्लास्टिकला पर्याय म्हणून कागदी, तसेच कापडी पिशव्यांचा वापर सुरू केला आहे. काही ग्राहकांकडून अजूनही प्लास्टिकच्या कॅरीबॅगची मागणी होते; पण व्यापारी अथवा विक्रेत्यांकडून स्पष्ट नकार दिला जात असल्याचे दिसत आहे. 

गुटखा बंदी मात्र कागदावर!

राज्य शासनाच्या प्लास्टिक बंदीला चांगले यश मिळत असताना गुटखा बंदी मात्र फसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गावांपासून शहरापर्यंत सर्वच ठिकाणी गुटख्याची राजरोस विक्री सुरू आहे. गुटखा तस्करीवर अनकेदा कारवाई होते; पण पुन्हा गुटखा विक्री सुरूच राहते. जर सरकार प्लास्टिक बंदीसाठी धडक कारवाईची मोहीम हाती घेत असेल, तर मग गुटखा बंदीसाठी का नाही? असा सवालही आता उपस्थित केला जाऊ लागला आहे. 

Tags : Kolhapur, Plastic, ban, Gutka, banned, cropped