Tue, Aug 20, 2019 04:07होमपेज › Kolhapur › प्लास्टिक बंदी : कोल्हापुरात 9 जणांवर कारवाई; 45 हजार दंड वसूल

प्लास्टिक बंदी : कोल्हापुरात 9 जणांवर कारवाई; 45 हजार दंड वसूल

Published On: Jun 24 2018 1:56AM | Last Updated: Jun 24 2018 1:45AMकोल्हापूर ः प्रतिनिधी

कोल्हापूर महापालिका प्रशासनाने शहरात प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करत 45 हजार दंड वसूल केला. बंदीनंतरही प्लास्टिक वापरणार्‍या 9 जणांवर कारवाई करून प्रत्येकी पाच हजार दंड करत हा दंड वसूल करण्यात आला. शाहूपुरी, राजारामपुरी, रंकाळा स्टँड परिसर आदी ठिकाणी ही कारवाई झाली, तर तब्बल साडेसहाशे किलो प्लास्टिक महापालिकेकडे जमा करण्यात आले. रविवारपासून प्लास्टिक बंदीची मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

दंड झालेल्यात मुकेश अमराणी, कोरडे जनरल स्टोअर्स, अवतार ट्रेडर्स, दीपक स्टोअर्स, कोल्हापूर स्विटस्, कोल्हापूर चिकन, केदारलिंग बेकर्स जनरल स्टोअर्स, योगेश आनंदराव केसरकर, दत्तोबा तातोबा नष्टे आदी नावाने महापालिका प्रशासनाने प्रत्येकी पाच हजारांच्या दंडाची पावती करून तो वसूल केला. 

प्लास्टिक बंदी अंमलबजावणीसाठी महापालिका आरोग्य विभागाने चार पथके तैनात केली आहेत. यात आरोग्य निरीक्षकांसह प्रत्येक पथकात दहा कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

दरम्यान, कोल्हापूरचे वैभव असलेल्या ऐतिहासिक रंकाळा तलावातील प्लास्टिकचा कचरा देवराज बोटिंग क्लबच्या वतीने काढण्यात आला. यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या बाटल्यांचा समावेश होता. क्लबचे मालक अमर जाधव यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. सामाजिक जाणीव व पर्यटकांचे आकर्षण असलेला रंकाळा स्वच्छ व सुंदर रहावा म्हणून स्वखर्चाने कर्मचार्‍यांकडून बोटिंगमधून कचरा जमा करत आहे. आठवडाभर ही मोहीम राबवणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.