होमपेज › Kolhapur › गावागावांत प्लास्टिक बंदीचा जागर

गावागावांत प्लास्टिक बंदीचा जागर

Published On: Jan 06 2018 1:22AM | Last Updated: Jan 05 2018 11:42PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्हा शंभर टक्के हागणदारीमुक्‍त केल्यानंतर आता जिल्हा परिषदेने प्लास्टिक पिशवी मुक्‍त जिल्हा करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. जनजागृती व दंडात्मक अशा दोन्ही पातळींवर ही मोहीम सुरू झाली असून गावागावांत प्लास्टिकबंदीचा जागर घुमू लागला आहे. प्लास्टिक वापरणार नसल्याचे 1029 पैकी 949 ग्रामपंचायतींनी ठराव केले असून, 289 ग्रामपंचायतींनी गावात बोर्ड लावले आहेत. 846 दुकानदारांना नोटिसा लागू करण्यात आल्या असून, प्लास्टिक पिशव्या वापरण्याबाबत ठरवून दिलेले नियम मोडल्यास दंडात्मक कारवाईसही सुरुवात करण्यात आली आहे. हातकणंगले तालुक्यातील माणगाव गावातील दुकानदारांकडून दंडाची वसुली करून कडक कारवाईची झलक जिल्हा परिषदेने दाखवून दिली आहे. 

प्लास्टिकमुळे पर्यावरणाच्या प्रदूषणासह मानवी आरोग्यावर होणार्‍या वाईट परिणामांची भयावहता लक्षात आल्यानंतर जिल्हा परिषदेने 2 ऑक्टोबरपासून जिल्ह्यात प्लास्टिक बंदीची मोहीम राबवण्याची घोषणा केली होती. पाणी व स्वच्छता विभागामार्फत ही मोहीम राबवण्यात येत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून जनजागृती केल्यानंतर आता अंतिम टप्पा सुरू करण्यात आला आहे. याअतंर्गत प्लास्टिक बंदीचे ठराव घेण्याची प्रक्रियाही  शेवटच्या टप्प्यात असून, अजून 80 ग्रामपंचायतींनी ठराव दिलेले नाहीत. 

नोंदणीशिवाय विक्री केल्यास दंडाची आकारणी

50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरण्यावर निर्बंध आले आहेत. तसे कोणी वापरल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. प्लास्टिक पिशवी वापरावयाची झाल्यास ती 50 मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीची व 8 बाय 12 इंचांपेक्षा जास्त आकाराच्या असणे बंधनकारक करण्यात आले आहे. अशा पिशव्या विक्रीसाठी ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीकडे किमान 48 हजार रुपये नोंदणी शुल्क भरावयाचे आहे. नोंदणीशिवाय विक्री केल्यास किमान 4 हजार रुपये दंडाची आकारणी सुरू करण्यात आली आहे. 

पाच तालुक्यांचा 100 टक्के प्लास्टिक पिशवी बंदीचा ठराव

करवीर, राधानगरी, पन्हाळा, शाहूवाडी, शिरोळ या पाच तालुक्यांमधील सर्वच ग्रामपंचायतींनी 100 टक्के प्लास्टिक पिशवी बंदीचा ठराव केला आहे. हातकणंगले व गडहिंग्लज तालुका 98 टक्के, कागल 83 टक्क्यांवर आहे. आजरा व चंदगड हे दोन तालुके मागे असून, त्यांची टक्केवारी अनुक्रमे 69 आणि 64 टक्के येते.