Sun, Jul 21, 2019 16:57
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › सोशल मीडियावरही प्लास्टिक बंदीची धूम

सोशल मीडियावरही प्लास्टिक बंदीची धूम

Published On: Jun 25 2018 1:47AM | Last Updated: Jun 25 2018 12:43AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

‘प्लास्टिक बंदी ही जंगले, नद्या व जलशयांना मिळालेली संजीवनी आहे, तिचे न कुरकुरता स्वागत करू या,’ ‘सवयी बदलू, देश बदलू,’ यासारख्या मेसेजनी सोशल मीडियावरही प्लास्टिक बंदीचे स्वागत होत आहे. शनिवारपासून राज्यात प्लास्टिक बंदी झाली, या निर्णयाच्या काही गंमतीशीर संदेशांनीही सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. राज्य शासनाने शनिवारपासून प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू केली. हा निर्णय तीन महिन्यांपूर्वीच झाला होता. शनिवारी एका दिवसात कोल्हापूर शहरातच प्लास्टिक पिशव्या वापरणार्‍यांवर कारवाई करून 45 हजारांचा दंड वसूल केला आहे. या निर्णयाची काटेकोर अंमलबजाणी सुरू आहे. सोशल मीडियावर त्याचे स्वागत होत आहे. विशेषतः तरुणांकडे या निर्णयाला प्रोत्साहन दिले जात आहे. 

‘सरकारने काही दिवसांपूर्वी तांदळाच्या डब्यातील पैसे काढले, आता गादीखालच्या प्लास्टिक पिशव्याही काढायला लावल्या,’ ‘बायकोची नवी धमकी-शॉपिंगला नेता की नाही, का जाऊ प्लास्टिकची पिशवी घेऊन,’ ‘दूध पिशवी चालते का नाही, का भांडे घेऊन दूध आणायला जायचे,’ ‘प्लास्टिक सर्जरी केलेल्यांनी रस्त्यावर जायचे का नाही,’ ‘नवी धमकी-थांब तुझ्या गाडीला प्लास्टिकची पिशवीच लावतो,’ यासारख्या विनोदी संदेशांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.  रविवारी बहुंताश घरांत मांसाहारी जेवणाचा बेत. मटण, मासे आणायचे तर पूर्वी प्लास्टिकची पिशवी दुकानदार द्यायचा. आता घरातूनच डबा घेऊन जावा नाही तर, मटण 450 रुपये आणि प्लास्टिक सापडले म्हणून पाच हजार असे 5450 रुपये घेऊन जावा, कापडी पिशवी घेऊन जा आणि भाजी आणा, आपले 5 हजार वाचतील. त्याची साडी आणा, असा बायकोचा उपदेश असलेल्या संदेशातून या निर्णयाला प्रोत्साहन दिले जात आहे.

प्लास्टिक बंदीसंदर्भात सामाजिक संघटना व सेवाभावी संस्थांकडून जनजागृती करण्यात येत आहे. प्लास्टिक बंदीचा व्यापारी व दुकानदारांनी चांगला धसका घेतला आहे. बाजारपेठेतील विक्रेते, भजी आणि वडापाव, खाऊ गल्लीतील गाडे व किराणा दुकानात खाकी, जाड कागदी पिशव्या ठेवण्यास सुरुवात केली आहे. ग्राहकांना सोबत कापडी पिशवी आणण्याचे आवाहन विक्रेते करीत आहेत. प्लास्टिक बंदीमुळे महिला बचत गटांना चांगले दिवस आले आहेत. कापडी व कागदी पिशव्यांची मोठ्या प्रमाणात मागणी होऊ लागली आहे.  सोशल मीडियावर प्लास्टिक बंदीचे नेटिझन्सकडून स्वागत होत असले, तरी प्लास्टिक बंदीची टर उडविणारे मजेदार मेसेज पाहायला मिळत आहेत. काळाच्या गरजेनुसार, चला थोडं बदलू या ‘नो प्लास्टिक’ म्हणत पर्यावरण रक्षण करू या, अशी हाकही  दिली जात आहे.

कापडी, कागदी पिशव्यांचे प्रशिक्षण

राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाली असून धडक कारवाई आणि जनजागृती दोन्ही आघाड्यांवर अंमलबजावणी सुरू आहे. कापडी व व कागदाच्या पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण देणारे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून नेटकर्‍यांकडून त्याचे उत्स्फूर्त स्वागत होत आहे.