कोल्हापुरात कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपी यशस्वी

Last Updated: Jun 06 2020 1:09AM
Responsive image
File Photo


कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

सीपीआर हॉस्पिटलमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपी यशस्वी झाली आहे. ही माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी दिली. हा प्रयोग कोल्हापूर जिल्ह्याच्या द़ृष्टीने दिलासादायक आणि लौकिकपात्र असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाच्या रक्तामधून प्लाझ्मा घेण्यासाठी सीपीआर रुग्णालयास राज्यातील सर्वात अत्याधुनिक असलेले प्लाझ्मा अफरेशिस मशिन प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यामुळे कोरोनामुक्त रुग्णाच्या रक्तामधून प्लाझ्मा घेणे शक्य झाले. यामुळे गंभीर, अत्यवस्थ कोरोना रुग्णांवर या प्लाझ्मा थेरेपीच्या माध्यमातून उपचार करण्याची सोय कोल्हापुरात उपलब्ध झाली आहे. कोरोनामुक्त झालेल्या जिल्ह्यातील पहिल्या रुग्णाच्या रक्तामधून प्लाझ्मा घेण्यात आला होता, हा प्लाझ्मा सीपीआरमधील एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णास देण्यात आला. प्लाझ्मा दिल्यानंतर तिसर्‍या दिवशी संबंधित कोरोना रुग्णाचा स्वॅब घेण्यात आला तो निगेटिव्ह आला आहे. तसेच तो रुग्ण आरोग्याच्या द़ृष्टीने अतिशय चांगला असल्याचेही देसाई यांनी सांगितले.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी कोल्हापुरात यशस्वी झालेली प्लाझ्मा थेरेपी ही सर्वार्थाने महत्त्वाची बाब असल्याचे सांगून ते म्हणाले, यापुढेही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना प्लाझ्मा दिला जाणार आहे. जिल्ह्यात पहिली प्लाझ्मा थेरेपी यशस्वी करण्यात सीपीआरमधील हिमॅटोलॉजिस्ट डॉ. वरुण बाफना यांच्यासह डॉ. विजय बर्गे, डॉ. शीतल यादव आणि डॉ. राजेंद्र मदने यांचे सक्रिय योगदान असल्याचे सांगत सीपीआरमध्ये काम करणार्‍या सर्वच वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांना त्यांनी धन्यवाद दिले.

पुण्याहून आलेला आणि जिल्ह्यात प्रथम आढळलेला, 18 एप्रिल रोजी कोरोनामुक्त झालेल्या युवकाच्या परवानगीने त्याच्या रक्तातील 550 मि.लि. प्लाझ्मा घेण्यात आला. कोरोनाग्रस्त अत्यवस्थ रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीच्या माध्यमातून उपचार करण्यासाठी तो उपयोगी ठरला. प्लाझ्मा थेरेपीच्या माध्यमातून कोरोनाबाधितांवर उपचार केल्याचा हा पहिलाच प्रयोग आहे. कोल्हापूरने वैद्यकीय क्षेत्रातही आपली वेगळी ओळख करून दिली आहे.  - दौलत देसाई, जिल्हाधिकारी