Wed, Apr 24, 2019 11:58होमपेज › Kolhapur › आपत्ती व्यवस्थापनाचे ग्रामस्तरावर नियोजन करा

आपत्ती व्यवस्थापनाचे ग्रामस्तरावर नियोजन करा

Published On: May 16 2018 1:38AM | Last Updated: May 16 2018 1:34AMकोल्हापूर : प्रतिनिधी

आपत्ती व्यवस्थापनाचे ग्रामपातळीवर नियोजन करा, आपत्कालीन परिस्थिती नियंत्रणासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे, परस्परात समन्वय ठेवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी मंगळवारी जिल्ह्यातील सर्व विभागांच्या अधिकार्‍यांना दिल्या. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व मान्सून पूर्वतयारीची आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली.

जिल्हाधिकारी सुभेदार म्हणाले, महाराष्ट्रात वेळेत मान्सून दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. 15 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे पूर्वानुभवावरून संभाव्य पूरबाधित ठिकाणे निश्‍चित करून त्याठिकाणी गावातच आपत्ती काळात मदत निर्माण व्हावी, यासाठी तरुण मंडळे, स्वयंसेवी संस्था यांना प्रशिक्षण द्या व आपत्ती व्यवस्थापनासाठी त्यांना तयार करा. 

उपलब्ध असणारी आपत्ती  व्यवस्थापनाची यंत्रणा व यंत्रसामग्री यांची पावसाळ्यापूर्वी तपासणी करून तहसीलदारांनी त्याबाबतचा अहवाल तत्काळ द्यावा, असे सांगत जिल्हाधिकारी म्हणाले, संभाव्य बाधित गावे स्थलांतरित करण्यासाठी निवारा निश्‍चित करावा. संपर्क तुटणार्‍या गावांची यादी तयार करून त्यांना तीन महिने पुरेल इतके अन्‍नधान्य सामग्री उपलब्ध करून द्यावी. 

सर्व विभागांनी आपत्ती व्यवस्थापनाचे गांभीर्याने नियोजन करावे. आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा अद्ययावत करावा. आपत्कालीन काळामध्ये संबंधित विभागप्रमुखांनी जिल्हाधिकार्‍यांच्या परवानगीशिवाय विनाअनुमती मुख्यालय सोडल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संभाव्य भूस्खलन होणार्‍या गावांची पाहणी करून आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करा. वाहतूक मार्ग बंद झाल्यास ते पूर्ववत करण्यासाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध ठेवा. डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो यासारख्या आजारांचा फैलाव होऊ नये यासाठी दक्षता घ्या, प्रत्येक आरोग्य केंद्रावर पुरेसा औषधसाठा ठेवा.

धरणातून सोडण्यात येणार्‍या पाण्याच्या विसर्गाबाबत वेळेत माहिती द्या. वार्‍यामुळे किंवा झाडांमुळे विद्युत वाहिन्या तुटून रस्त्यावर पडल्यास त्या तत्काळ दूर करून विद्युत पुरवठा सुरळीत करा. कोणत्याही प्रकारची आपत्ती घडल्यास त्याची माहिती तत्काळ आपत्ती व्यवस्थापन कक्षास द्यावी. 

सोशल मीडियावरून आपत्ती संदर्भात काही मेसेज आल्यास त्याची तत्काळ दखल घेऊन त्याबाबतची वस्तुस्थिती लोकांपर्यंत पोहोचवावी व नागरिकांनी देखील सोशल मीडियावर अशा प्रकारची माहिती आल्यास ती माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षास कळवावी व त्याबाबत खात्री करून घ्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना दिल्या. 

पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी गतवर्षीच्या स्थितीचा अभ्यास करून यावर्षी चूक होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे सांगत गगनबावडा मार्गे गोव्याकडून वाहतूक होणार्‍या बसेस परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य ठिकाणी थांबवाव्यात, अशी सूचना केली. 

महापालिका आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी यांनी तरुण मंडळे, स्वयंसेवी संस्था यांच्याशी संपर्क ठेवण्याच्या सूचना यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. इंधन उपलब्धता स्थलांतरासाठीची ठिकाणे, नाले सफाई, औषधांची उपलब्धता, धोकादायक इमारती याबाबत योग्य ती कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले. 

बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ आदींसह विविध विभागांचे अधिकारी, संस्था, संघटनांचे प्रतिनिधी, सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार उपस्थित होते.

आपत्ती काळात गैरहजर राहणार्‍यांवर कारवाई : सीईओ

जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार म्हणाले, जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्ययावत आहे. जिल्ह्यात 460 धोकादायक शाळा-खोल्या असून ज्या खोल्यांची निर्लेखन प्रक्रिया अपूर्ण आहे, ती तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्रामसेवक, मेडिकल ऑफिसर व जिल्हा परिषदेचे अन्य अधिकारी, कर्मचारी आपत्ती काळात गैरहजर राहिल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.