Mon, Mar 25, 2019 18:09होमपेज › Kolhapur › इचलकरंजीत आरोपीकडून पिस्तूल जप्त

इचलकरंजीत आरोपीकडून पिस्तूल जप्त

Published On: Dec 03 2017 1:32AM | Last Updated: Dec 03 2017 12:05AM

बुकमार्क करा

इचलकरंजी : प्रतिनिधी

रेकॉर्डवरील गुन्हेगार अविनाश शेखर जर्मनी (वय 31, रा. जवाहरनगर) याच्याकडून शिवाजीनगर पोलिसांनी देशी-विदेशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले. अविनाश जर्मनी याच्यावर खून, मारामारी, घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. साईनगर येथील किराणा व्यापारी हल्याळ याला 5 हजार रुपयांच्या खंडणीसाठी मारहाण केली होती. त्यानंतर तो फरारी होता. पोलिसांनी शुक्रवारी रात्री जवाहरनगर येथे त्याच्या मुसक्या आवळल्या. 

वाढत्या घरफोडी आणि चोरीच्या घटनेनंतर शिवाजीनगर पोलिसांकडून गस्त वाढवण्यात आली होती. शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना रेकॉर्डवरील गुन्हेगार अविनाश जर्मनी हा पोलिसांना चकवा देऊन पळून जात होता. त्याचवेळी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. जर्मनी याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून देशी-विदेशी बनावटीची पिस्तूल पोलिसांना मिळून आली. 

दरम्यान, महिन्यापूर्वी साईनगर परिसरातील किराणा व्यापारी हल्याळ याच्याकडे जर्मनी टोळीने 5 हजार रुपयांची खंडणी मागितली होती. त्याने खंडणीस नकार दिल्यानंतर त्याला जबर मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी अविनाश जर्मनीसह सहाजणांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मारहाण प्रकरणातील चार संशयितांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले होते.

मात्र, या मारहाणीनंतर अविनाश जर्मनी हा फरार होता. शुक्रवारी रात्री पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. जर्मनी याच्यावर इचलकरंजीसह कोल्हापूर, वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक विनायक नरळे यांनी दिली.  जर्मनी याने हे पिस्तूल कोठून खरेदी केले आणि त्यामागचा उद्देश काय, याची सखोल चौकशी सुरू आहे.