Wed, May 22, 2019 22:26



होमपेज › Kolhapur › तीर्थक्षेत्र आराखड्याला लवकरच मंजुरी

तीर्थक्षेत्र आराखड्याला लवकरच मंजुरी

Published On: Jan 16 2018 2:07AM | Last Updated: Jan 16 2018 1:49AM

बुकमार्क करा




कोल्हापूर : प्रतिनिधी

करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्याला लवकरच मुहूर्त लागणार आहे. बुधवार, दि. 17 जानेवारी रोजी मुंबई येथे आराखड्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत अंतिम बैठक होणार असून, पहिल्या टप्प्यातील निधी मंजूर होण्याची शक्यता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी येथे व्यक्‍त केली. सर्किट हाऊस येथे  झालेल्या बैठकीत त्यांनी माहिती दिली. 

एकूण 250 कोटींच्या तीर्थक्षेत्र आराखड्यापैकी पहिल्या टप्प्यासाठी 68 कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. हा प्रस्ताव विभागीय आयुक्‍तांकडून मंजूर होऊन मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला होता. गतवर्षी दसर्‍याच्या मुहूर्तावर महालक्ष्मी मंदिर तीर्थक्षेत्र आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील कामांचा मुहूर्त केला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली होती; पण याबाबत मुख्यमंत्री  फडणवीस यांच्याकडून अंतिम निर्णय न झाल्याने हा निर्णय रखडला होता. 

आज झालेल्या बैठकीत आराखड्याबाबत अंतिम मंजुरीची बैठक बुधवारी होणार असल्याचे सांगून या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी होऊन आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील निधी मंजूर होईल, असे पालकमंत्री पाटील यांनी 
सांगितले. 

तसेच पहिल्या टप्प्यात तातडीने दर्शन मंडप उभारणी व पार्किंगची दोन ठिकाणे विकसित केली जातील, असेही त्यांनी सांगितले. या वर्षभरात अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि जोतिबा मंदिर तीर्थक्षेत्र विकासाची कामे मार्गी लावणार असल्याचेही ना. पाटील यांनी सांगितले.