Sun, Oct 20, 2019 01:06होमपेज › Kolhapur › फुलेवाडी-रिंगरोडचे काम रखडले

फुलेवाडी-रिंगरोडचे काम रखडले

Published On: Jan 15 2018 1:48AM | Last Updated: Jan 14 2018 11:21PM

बुकमार्क करा
फुलेवाडी : वार्ताहर  

फुलेवाडी-रिंगरोडचे काम नगरोत्थान योजनेतून गेली 7 वर्षे चालू आहे. अत्यंत संतगतीने काम सुरू असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.  शहरांतर्गत रस्ते चकचकीत होण्यासाठी नगरोत्थान योजनेतून शहर व उपनगरातील 39 रस्ते 50-57 कि. मी. लांबीचे प्रस्तावित आहेत. राज्य शासनाने या प्रकल्पास मान्यता देऊन एकूण निधीच्या 25 टक्के रक्कम वितरित केली आहे. या रस्त्याची कामे पूर्ण करण्यासाठी दीड वर्षाचा कालावधी होता. परंतु, 7 वर्षे होऊन देखील रस्त्याची कामे अपूर्ण आहेत. 2011 साली 108 कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊनही कामे अपूर्ण आहेत. 

फुलेवाडी-रिंगरोड परिसरात अयोध्या कॉलनीपासून आपटेनगर फाटा रस्त्यापर्यंत रस्त्याची एक बाजू अर्धवट पूर्ण झाली आहे. त्या अर्ध्या रस्त्यावर 2 ते 3 फुटांचे खड्डे पडलेले आहेत. या परिसरातील नागरिकांना  त्रास होत आहे. हा रस्ता पूर्ण होण्यासाठी 3 ते 4 वेळा नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. तसेच या रस्त्याचे उद्घाटन 2 ते 3 वेळा श्रेयवादातून झाले आहे; पण उद्घाटनानंतर 3 ते 4 दिवस काम होते व पुन्हा बंद पडते. आठ दिवसांपूर्वी महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी महापालिकेच्या सर्व अधिकार्‍यांसमवेत रिंगरोडची पाहणी करून रस्त्याची कामे, इतर नागरिकांनी केलेल्या तक्रारींचे निवारण करण्याच्या सूचना केल्या होत्या.

खड्ड्यांमुळे अपघात होत असल्याची तक्रार नागरिकांनी आयुक्तांकडे केली होती. खड्डे बुजवण्याचे आदेश संबंधित अधिकार्‍यांना दिले होते; पण परिस्थिती जैसे थे आहे. 
महापालिकेच्या सभेवेळी या रस्त्याची चर्चा होते. विधानसभेत आ.  नरके यांनी सुद्धा नगरोत्थानमधील रस्त्याचा प्रश्‍न मांडला होता. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी 15 डिसेंबर 2017 अखेर नगरोत्थानाची सर्व कामे पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले होते; पण महापालिकेतील अधिकारी मात्र ठेकेदारांना सामील असल्यामुळे मूग गिळून गप्प आहेत. रस्त्याची कामे व खड्डे तत्काळ बुजवले नाही तर आयुक्तांना घेराव घालण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.