Tue, Jul 16, 2019 23:55होमपेज › Kolhapur › भादोले स्फोटातील जखमीचा मृत्यू

भादोले स्फोटातील जखमीचा मृत्यू

Published On: Feb 03 2018 2:21AM | Last Updated: Feb 03 2018 12:19AMपेठवडगाव : वार्ताहर

हातकणंगले तालुक्यातील भादोले रस्त्यावर गुरुवारी शिकलगार ब्रदर्स यांच्या फटाका कारखान्यातील शक्‍तिशाली स्फोटात होरपळून गंभीर जखमी झालेल्या शिवाजी धोंडी दबडे (वय 58, रा. सिद्धार्थनगर, पेठवडगाव) यांचा गुरुवारी रात्री 3 वाजता कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी भादोले रस्त्यावरील वडगावच्या शिकलगार ब्रदर्सच्या फटाका कारखान्यात भीषण स्फोट झाला होता. यामध्ये प्रकाश शिवराम सावंत या कामगाराचा होरपळून जागीच मृत्यू झाला, तर शिवाजी धोंडी दबडे हे गंभीर जखमी झाले होते. गुरुवारी रात्री 3 वाजता दबडे यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी दबडे यांचा मृतदेह सिद्धार्थनगर येथील घरात आणताच नातेवाइकांनी मोठा आक्रोश केला.

त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सावंत व दबडे यांची परिस्थिती हलाखीची आहे.  वडगाव नगरपालिकेच्या सत्ताधारी युवक क्रांती महाआघाडीच्या नेत्या प्रविता सालपे, बाल व महिला समितीच्या सभापती शबनम मोमीन, सावित्री घोटणे, नम्रता ताईगडे, अलका गुरव यांच्यासह नागरिकांनी सावंत व दबडे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.  दबडेंची भावना शिवाजी दबडे यांनी अखेरचे शब्द बोलताना, माझ्या एकुलत्या मुलाचा सांभाळ करा आणि मी 30 पैसे हजेरीपासून काम करीत आलो आहे. माझ्या मालकाला कोणी बोलू नका, अशी भावना नातेवाइकांसमोर व्यक्‍त केल्याने अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.