Wed, Jun 26, 2019 23:30होमपेज › Kolhapur › कीड, वातावरणामुळे कोट्यवधींची हानी

कीड, वातावरणामुळे कोट्यवधींची हानी

Published On: Aug 30 2018 1:18AM | Last Updated: Aug 30 2018 12:05AMकोल्हापूर : संग्राम घुणके

दिवसभरात ढगाळ वातावरण, गेले तीन महिने सूर्यप्रकाशाचा अभाव हे वातावरण किडींच्या पोषणास सध्या पोषक ठरत आहे. याचा सर्वच पिकांवर परिणाम जाणवत आहे. पावसाळ्यात जिल्ह्यात सलग 70 दिवस पाऊस पडला. बदलत्या हवामानामुळे ऊस, सोयाबीन, मिरची, मका ही पिके किडीच्या भक्ष्यस्थानी राहिली असून, यामुळे पिकांचे अपरीमित नुकसान झाले आहे. कीड, पिकांच्या वाढीअभावी 15 ते 20 टक्के सर्वच पिकांच्या उत्पादनात घट होऊन कोट्यवधी रुपयांच्या हानीची भीती व्यक्‍त केली जात आहे. 

यंदाच्या खरीप हंगामात बदललेल्या हवामानामुळे उसावर तांबेरा, लोकरी मावा याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. याबाबत नुकसानीची आकेडवारी कृषी विभागाकडून अद्याप उपलब्ध झालेली नाही. गगनबावडा, करवीर, राधानगरी, भुदरगड, हातकणंगले या तालुक्यांतील सुमारे 15 ते 20 टक्के क्षेत्र बाधित झाल्याचे बोलले जात आहे. तसेच हुमणीमुळे उसाचे हजारो हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. 
भाजीपाला पिकावर रस शोषणार्‍या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. सूर्यप्रकाशाअभावी मिरचीच्या रोपांची वाढच झाली नाही. तसेच मावा, तुडतुडे, फुलकिडे व पांढरी माशी यांचा प्रादुर्भाव झाला आहे. सोयाबीन पिकाची पाने कुरतडणार्‍या अळीमुळे मोठी हानी झाली आहे. हातकणंगले, शिरोळ तालुक्यांत याचा प्रादुर्भाव जाणवत आहे.

या दिवसात तसेच खरीप संपल्यानंतर काही दिवस चारा म्हणून मक्याचा दूध उत्पादकांना आधार असतो. मका पिकावर यंदा पाने खाणारी नवीन अळी दिसून येत आहे.

अशी काळजी घ्या
 उसावरील तांबेरा, लोकरी मावा या किडीसाठी  क्‍लोरोपायरीफॉस 50 टक्के 30 मिली, डायथॅनियम 45 किंवा ब्लू कॉपर 30 ग्रॅम यांचे मिश्रण 15 लिटर पाण्यातून फवारावे.
 हुमणीसाठी क्‍लोरोपायरीफॉस 50 टक्के 1 लिटर किंवा फ्लू बेन्डॅ अमाईड 250 मिली किंवा मेटॉरायझम 250 मिलीपैकी 1 चारशे लिटर पाण्यात मिसळून उसाच्या मुळाजवळ आळवणी करावी.
 भाजीपाला, मका, सोयाबीन यावर रस शोषणार्‍या अळीसाठी शेतात पिवळे व निळे चिकटबोर्ड लावावेत, लॅम्डासायलोथ्रीन  10 मिली 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी व त्यामध्ये 19 : 19 : 19 विद्राव्य खत 75 ग्रॅम टाकावे.

जिल्ह्यातील विविध पिकांखालील क्षेत्र हेक्टरमध्ये
ऊस : क्षेत्र 1 लाख 42 हजार 
भात : 1 लाख 10 हजार
भुईमूग : 44 हजार 187
सोयाबीन : 46 हजार 225
भाजीपाला : 62 हजार 
चारा : 8 हजार
नाचणी : 19 हजार 571