होमपेज › Kolhapur › मेरी वेदर मैदानावर कृषी प्रदर्शनाला परवानगी

मेरी वेदर मैदानावर कृषी प्रदर्शनाला परवानगी

Published On: Jan 20 2018 1:39AM | Last Updated: Jan 20 2018 1:33AMकोल्हापूर : प्रतिनिधी

मेरी वेदर मैदान खेळाव्यतिरिक्त अन्य कारणांसाठी देऊ नये, असा महापालिका सर्वसाधारण सभेत ठराव करण्यात आला होता. त्यानुसार भीमा कृषी प्रदर्शनाला नाकारलेली परवानगी महापलिकेला द्यावी लागली. राज्य शासनाने पूर्व परवानगीचे शुक्रवारी दिलेल्या पत्रावर आयुक्तांनी तातडीने कार्यवाही केली. या प्रदर्शनाला मनोरुग्णाकडूनच विरोध झाला, चांगल्या माणसांकडून असे काम होणार नाही, अशी टीका खासदार धनंजय महाडिक यांनी आ. सतेज पाटील यांचे नाव न घेता केली. सायंकाळी त्यांच्या हस्ते प्रदर्शन मंडपाचे भूमिपूजन झाले.

मेरी वेदर मैदान खेळा व्यतिरिक्त अन्य कारणांसाठी वापरू नये, असा ठराव 20 मार्च 2017 रोजी झालेल्या महासभेत करण्यात आला होता. यामुळे दि.26 ते दि.29 जानेवारी या कालावधीत होणार्‍या भीमा कृषी प्रदर्शनासाठी महापालिकने हे मैदान नाकारले होते. याच दरम्यान हे मैदान क्रिकेट स्पर्धेसाठी देण्यात आले होते. मैदान नाकारल्यावरून खा. महाडिक आणि आ. सतेज पाटील यांच्यातील संघर्षाला चांगलीच धार आली होती. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू होते. यासर्व पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाच्या महसूल विभागाने आज दुपारी थेट महापालिका आयुक्तांना या प्रदर्शनास पूर्वपरवानगी देत असून यापुढील कार्यवाही करण्याची सूचना दिली. यानंतर आयुक्तांनी प्रदर्शनासाठी परवानगी दिली. सायंकाळी खा. महाडिक यांनी प्रदर्शन मंडप उभारणीच्या कामाचे भूमिपूजन केले.

खा. महाडिक म्हणाले, आपण विकासाची, समाजहिताची, प्रगतीची कामे करत आलो आहोत. मात्र, संकुचित बुद्धीच्या लोकांनी जाणीवपूर्वक कृषी प्रदर्शनाला विरोध करण्याची भूमिका घेतली. अट्टाहास केला, खोटी कारणे दिली, युवकाला उभे करून मैदान बुक करण्यास सांगितले. मात्र, सत्याचा विजय झाला आहे, खोट्याचा पराभव झाला आहे. या प्रदर्शनाचा कोल्हापूरसह शेजारील तीन-चार जिल्ह्यांतील शेतकर्‍यांना लाभ होतो, नवनवीन तंत्रज्ञान, उत्पादने, प्रयोगशीलता याची माहिती होते. वेगवेगळ्या तज्ज्ञांची व्याख्याने असतात, 200 महिला बचत गटांना चालना मिळते, अनेक जातीवंत जनावरे पाहायला मिळतात, त्यांच्याविषयी माहिती मिळते, हे सर्व समाजाच्या हिताचेच असते; पण त्याला जाणीवपूर्वक विरोध करण्याचे काम करण्यात आले. हे काम एकादा मनोरुग्णच करू शकतो, चांगल्या माणसाचे हे काम नाही, असा टोलाही त्यांनी आ. सतेज पाटील यांचे नाव न घेता लगावला.

खेळाडूंची इतकी काळजी असणार्‍यांनी खेळाच्या विकासासाठी काय केेले? किती स्पर्धा घेतल्या, या मैदानावर किती स्पर्धा झाल्या, हे सांगावे असे सांगत ते म्हणाले, या प्रदर्शनासाठी चार लाख अनामत रक्कम देतो, मैदान पुन्हा सुस्थितीत करून ते महापालिकेच्या ताब्यात दिले जाते, त्यानंतरच ती अनामत रक्कम मिळते. कोणत्याही प्रकारचे खड्डेे पडत नाहीत, प्रदर्शन संपल्यानंतर तीन ते चार दिवसांत संपूर्ण मैदान पूर्ववत केले जाते. खेळाचा इतका पुळका असेल तर किती मैदाने आहेत, त्यांचा विकास करण्यात आला. यामुळे राज्य शासनाने दिलेल्या जागा परत घ्याव्यात, अन्यथा त्या जागांची कधी विक्री केली जाईल हे सांगता येत नाही असाही टोला त्यांनी लगावला.

केवळ धनंजय महाडिक यांना विरोध म्हणून, त्यांच्या चांगल्या कामाला खो म्हणून हे कृत्य केल्याचा आरोपही त्यांनी केला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याप्रश्‍नी सहकार्य केले, त्यामुळे हतबल झालेले प्रशासन कार्यरत झाले, असे सांगत यावर्षी या प्रदर्शनाला दुप्पट प्रतिसाद मिळेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी गट नेता विजय सूर्यवंशी, नगरसेवक सत्यजित कदम, राजसिंह शेळके, शेखर कुसाळे, किरण नकाते, सुनील कदम, कमलाकर भोपळे, राजाराम गायकवाड, नगरसेविका उमा इंगळे, भाग्यश्री शेटके, समीर सेठ, सुजित चव्हाण, उत्तम पाटील, डॉ. अजित शिंदे, डॉ. सुनील काटकर, तानाजी पवार, इंद्रजित जाधव आदीं उपस्थित होते.

‘जय बजरंग बली तोड दे दुश्मन की नली’
भूमिपूजनावेळी नगरसेवक भोपळे यांनी ‘जय बजरंग बली’ अशी घोषणा दिली. यानंतर कार्यकर्त्यांनी ‘जय बजरंग बली, तोड दे दुश्मन की नली’ अशा घोषणा दिल्या. यावेळी ‘भगवान के घर देर है लेकीन अंधेर नही’ असेही खा. महाडिक यांनी सांगितले.

सहा कोटी किमतीचा ‘युवराज’ यंदाचे आकर्षण
या प्रदर्शनात हरियानातील युवराज हा रेडा सहभागी होणार आहे. हे प्रदर्शनाचे यंदाचे आकर्षण राहील. या रेड्याची किंमत सहा कोटी रुपये आहे, त्याला पाहण्यासाठी गर्दी होईल, असेही खा. महाडिक यांनी सांगितले.

थेट राज्य शासनाचेच पत्र
कृषी प्रदर्शनावर खा. महाडिक व आ. पाटील यांच्यात कलगीतुरा रंगला होता. प्रदर्शनासाठी मैदान मिळणार की नाही, याचीच सर्वत्र चर्चा होती. याप्रकरणात दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडत होत्या. याप्रकरणी थेट राज्य शासनाच्या महसूल विभागानेच आयुक्तांना पत्र देत, या प्रदर्शनासाठी राज्य शासन पूर्व परवानगी देत असून, पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मेरी वेदरची जागा राज्य शासनाने 1980 साली महसूलमुक्त कब्जेहक्काने महापालिकेस दिली आहे. ही जागा देताना घालण्यात आलेल्या अटींनुसार सदर जागेचा वापर खेळाव्यतिरिक्त अन्य कारणांसाठी करायचा असेल तर राज्य शासनाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक केले आहे. भीमा कृषी प्रदर्शन ही सार्वजनिक स्वरूपाची बाब आहे, त्याचा शेतकर्‍यांना लाभ होतो, तसेच यामध्ये राज्य शासनाचा कृषी विभाग सहभागी असल्याने या प्रदर्शनाला अग्रक्रम द्यावा, असेही या पत्रात म्हटले आहे. महापालिकेतील सत्तेच्या जोरावर खा. महाडिक यांना शह देण्याचा प्रयत्न झाला. मात्र, थेट राज्य शासनाकडूनच परवानगी देण्यास भाग पाडत खा. महाडिक यांनी काटशह दिल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.