Wed, Feb 20, 2019 00:26होमपेज › Kolhapur › तालुक्याच्या ठिकाणी कायमस्वरूपी हेलिपॅड

तालुक्याच्या ठिकाणी कायमस्वरूपी हेलिपॅड

Published On: Mar 23 2018 1:57AM | Last Updated: Mar 23 2018 12:58AMकोल्हापूर : अनिल देशमुख

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आता हेलिकॉप्टरचे लँडिंग आणि टेक ऑफ होणार आहे. राज्य शासनाने हेलिपॅड धोरण जाहीर केले असून, त्याद्वारे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कायमस्वरूपी हेलिपॅड उभारण्यासाठी जागा निश्‍चित करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत.

कमी वेळेत अधिक अंतरासाठी आणि हव्या त्या ठिकाणी हवाई प्रवासासाठी हेलिकॉप्टर सर्वोत्तम पर्याय आहे. हेलिकॉप्टरचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. प्रवासासह नैसर्गिक आपत्ती, सुरक्षा आदी कारणास्तवही हेलिकॉप्टर वापर होत आहे. निवडणुकांच्या काळात तर प्रचारासाठी हेलिकॉप्टरचा सर्वाधिक वापर होत असतो. हेलिकॉप्टरसाठी ऐनवेळी हेलिपॅड तयार केली जातात. मात्र, अशा हेलिपॅडमुळे सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो, त्यातून अनेक लहान-मोठे अपघातही होत आहेत. या सर्व पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने आता हेलिपॅड धोरण तयार केले आहे. या धोरणांतर्गत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कायमस्वरूपी हेलिपॅड उभारण्यात येणार आहे.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही हेलिपॅड उभारण्यात येणार आहेत. याकरिता योग्य जागा निश्‍चित केल्या जाणार आहेत. भौगोलिक स्थिती, हवामान आदींसह तालुक्यातील सर्व भागांना जोडले जाणारे ठिकाण आदी विविध बाबींचा विचार करून हेलिपॅडसाठी जागा निश्‍चित केल्या जाणार आहेत. या जागा निश्‍चित करून त्याबाबतचा अहवाल तातडीने राज्य शासनाला सादर कराव्यात, अशा सूचनाही जिल्हाधिकार्‍यांना दिल्या आहेत. या निर्णयाची जिल्ह्यातही तातडीने अमंलबजावणी केली जाणार आहे, त्यानुसार प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले.

Tags : Kolhapur, Kolhapur News, Permanently, helipad,  taluka place