Sat, Apr 20, 2019 07:56होमपेज › Kolhapur › इंधनावर भरमसाट कर का, जनतेने सवाल विचारला पाहिजे : चिदम्बरम

इंधनावर भरमसाट कर का, जनतेने सवाल विचारला पाहिजे : चिदम्बरम

Published On: Jun 05 2018 1:16AM | Last Updated: Jun 05 2018 12:39AMकोल्हापूर : प्रतिनिधी

मे 2014 मध्ये कच्च्या तेलाचा जो दर होता, त्यापेक्षा कितीतरी कमी दर सध्या आहे. तरीही पेट्रोल, डिझेलच्या किमती भरमसाट वाढवल्या जात आहेत. पेट्रोल, डिझेल दरवाढीतून सरकारला पैसा हवा आहे, असा आरोप माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी सोमवारी केला. इंधनावर भरमसाट कर का, असा सवाल जनतेने विचारला पाहिजे, असे ते म्हणाले. कोल्हापूर दौर्‍यावर आलेल्या चिदम्बरम यांनी संपादकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपली मते व्यक्त करत सकारवर टीका केली.

पेट्रोल, डिझेलची दरवाढ का केली जाते, असा सवाल करत चिदम्बरम म्हणाले, मे 2014 मध्ये कच्चे तेल 102 ते 137 डॉलर प्रतिबॅरल होते, त्यावेळी आम्ही पेट्रोलचे दर 70-72 रुपयांपर्यंत स्थिर ठेवले होते. हे सरकार आल्यानंतर तर कच्च्या तेलाचे दर प्रचंड कमी झाले. तेलाचा उत्पादन खर्च सारखाच आहे, त्यात कोणतीही वाढ झालेली नाही. तरीही केंद्र सरकार पेट्रोल, डिझेलवर 12 रुपये अतिरिक्त कर लावून मोठा नफा कमवत आहे. राज्य शासनाने पेट्रोलसाठी 10 रुपये, तर डिझेलसाठी 11 रुपये अतिरिक्त कर लावला आहे. मे 2014 ला जे दर होते, त्याप्रमाणे आता दर का नाहीत, असा सवाल कोणीतरी विचारला पाहिजे. कर का वाढवले जातात, याचीही विचारणा झाली पाहिजे, असे सांगत या सरकारला पेट्रोल, डिझेल दरवाढीतून केवळ महसूल हवा आहे. लोक संतप्त आहेत. काँग्रेस पक्षाच्या वतीनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र, सध्या अधिवेशन सुरू नाही, अधिवेशनात सरकारकडे याबाबत विचारणा करू.

देशात काही जण भीतीच्या छायेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सततच्या परदेश दौर्‍यावर टीका करताना चिदम्बरम म्हणाले, तुमचे परदेशाशी संबंध कसे आहेत, हे लोकांसाठी फार महत्त्वाचे नसते. देशाची अर्थव्यवस्था कशी आहे, हे लोकांच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असते. दहापैकी नऊ लोक हे अर्थव्यवस्थेला मत देणारे असतात. मात्र, देशात सध्या काही जण भीतीच्या छायेखाली आहेत,  असेही त्यांनी सांगितले.

बँकिंग क्षेत्र अडचणीत

बँकिंग क्षेत्र सध्या अडचणीत आहे. मुद्रा योजना म्हणजे अन्य योजनांचे एकत्रीकरणच आहे. हे कर्ज 43 हजार रुपये इतके आहे. उद्योग, व्यवसायासाठी मोठे कर्ज मिळत नाही, त्यामुळे या क्षेत्रांचा विकास घटत चालला आहे, त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असल्याचेही चिदम्बरम यांनी सांगितले. 

आकडेवारी फसवी

हे सरकार फसवी आकडेवारी जाहीर करत असते, असा आरोप करत ते म्हणाले, रोजगारनिर्मिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिली असल्याचे सांगण्यात येते. मात्र, वस्तुस्थिती तशी नाही. रोजगार आहे तितकेच आहेत, त्यात म्हणावी तशी वाढ झालेली नाही. केवळ रोजगार करणारे एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी स्थलांतरित होत आहेत. नव्या रोजगाराच्या ठिकाणची नोंद होत आहे. मात्र, रोजगार सोडलेली नोंद होत नाही. अशाप्रकारे वाढीव आकडेवारी सांगितली जात असल्याचा आरोपही चिदम्बरम यांनी केला.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी 2019 च्या निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी तयार असल्याचे सांगितले आहे, काँग्रेसची ही भूमिका आहे का, अशी विचारणा करता चिदम्बरम म्हणाले, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना एका कार्यक्रमात जर 2019 मध्ये काँग्रेसचे सरकार आले, तर तुम्ही पंतप्रधान होणार का? त्यावर आपण तयार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले होते. तो प्रश्‍न असा होता की, त्यावर राहुल गांधी यांनी असे उत्तर दिले. हा प्रश्‍न कसा विचारला गेला होता ते तुम्ही पुन्हा पाहू शकता, असे सांगत असे काही प्रश्‍न असतात की, ज्याचे उत्तर हो अथवा नाही, असे दिले तरी एकच अर्थ काढता येतो, असेही चिदम्बरम यांनी सांगितले.

शेतकरी खूश नाहीत
राज्यातील शेतकरी कसे आहेत, असा सवाल करत पी. चिदम्बरम यांनी संवादाला प्रारंभ केला. राज्यात शेतकर्‍याच्या पिकाला किमान वैधानिक किंमत (हमीभाव) मिळत नाही. यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी फारसे खूश नाहीत. तेलंगणा सरकारने शेतकर्‍यांना हमीभाव देण्यास सुरुवात केली आहे. तो अंतिम भाव नसला तरी ते सरकार दोनवेळा चार हजार रुपयांप्रमाणे पिकांना हमीभाव देत असल्याचे त्यांनी सांगितले. पी. चिदम्बरम म्हणाले, कृषी विभागाच्या निधीचा आराखडा म्हणजे त्यांचा अर्थसंकल्पच असतो. वर्षाच्या प्रारंभीच कृषी विभागाने त्यांचा निधीचा आराखडा तयार करून तो अर्थ विभागाला सादर करण्याची गरज आहे.  कृषी विभागासाठी स्वतंत्र आराखडा तयार करून त्यासाठी निधीची तरतूद करता येईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी आ. सतेज पाटील, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, दै. ‘पुढारी’चे समूह कार्यकारी संपादक सुरेश पवार,  डॉ. जे. एफ. पाटील, पुरवणीचे कार्यकारी संपादक श्रीराम पचिंद्रे, ऋतुराज पाटील उपस्थित होते.