Thu, Apr 25, 2019 05:29होमपेज › Kolhapur › कोल्हापूर के लोग समझदार है!

कोल्हापूर के लोग समझदार है!

Published On: Aug 17 2018 1:35AM | Last Updated: Aug 17 2018 12:22AMकोल्हापूर : प्रतिनिधी

देश में बदलाव की शुरुआत होने के लिए युवाओं को संघटित होने की जरूरत है, कोल्हापूर के लोग समझदार है, उन्हें भले बुरे की समझ है,  वो देश में राजनीतिक बदलाव के लिए  हमारे संघटन के साथ जूड जाए, अशी साद दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी कोल्हापूरच्या तरुणाईला दिली होती.  वाजपेयी 1974  व 1984  मध्ये कोल्हापुरात पक्षाच्या कार्यक्रमांसाठी आले होते. 

1974 च्या काळात देशात सर्वत्र काँग्रेसचे वादळ होते; पण जनसंघाचे प्रमुख नेते आपल्या विचारांचा कार्यकर्ता ग्रामीण भागात तयार करण्यासाठी विविध सभा घेत होते. अशाच जनसंघाच्या एका कार्यक्रमात युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी वाजपेयी कोल्हापुरात आल्याचे भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष वोरा यांनी सांगितले. रात्री सर्किट हाऊसवर मुक्काम केला. यावेळी  शंकरराव निकम, कृष्णराव सोळंकी,अण्णा डांगे, गोपाळराव माने, दादासाहेब सांगलीकर, सुभाष वोरा या मंडळींनी वाजपेयींचे स्वागत केले. कार्यकर्त्यांशी चर्चा करून कोल्हापूरच्या राजकीय स्थितीची माहिती घेतली. सकाळी मोजक्याच कार्यकर्त्यांना घेऊन त्यांनी रंकाळ्यावर फेरफटका मारला.कवी मनाच्या वाजपेयींना या ठिकाणी एक कविताही सुचली होती, ती त्यांनी कार्यकर्त्यांना म्हणूनही दाखवली.  तरुणाईशी संवाद साधण्यासाठी प्रायव्हेट  हायस्कूलच्या समोरील रिकाम्या असणार्‍या जागेत  (सध्याचे नवीन देवल क्लब) समता परिषद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोल्हापुरी फेटा बांधून त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी राजकीय फटकेबाजी करत तरुणाईला जनसंघाचे कार्यकर्ते होण्याची साद घातली. यानंतर कोल्हापूरच्या शंकराचार्य पिठाला भेट देऊन शंकराचार्य यांच्याशी चर्चा केली.देशभरातून भाजप पक्षासाठी निधी संकलनाचे काम सुरू होते तेव्हा कोल्हापूर व इचलकरंजी येथील  कार्यकर्त्यांनी प्रत्येकी  1 लाख रुपयांचा निधी जमा केला होता.या निधीचा स्वीकार करण्यासाठी वाजपेयी कोल्हापुरात आले होते. पक्षाचे काम कमी असतानाही अटलजी येणार, या एकाच कारणाने फार मोठी गर्दी झाली होती.  इंदिरा गांधीच्या संदर्भात बोलणार म्हणूनच त्यांच्या दौर्‍याकडे लक्ष लागून राहिले होते. आणि त्यांनी आपल्या भाषणातून ते दाखवून दिले. इंदिरा गांधींना विरोध करणारा सबळ नेता म्हणूनच अटलजींकडे पाहिले जायचे.विरोधी पक्षात असले तरी ते देशाचे पंतप्रधान होतील, असा आशावाद स्थानिक कार्यकर्त्यांनी यावेळी बोलून दाखवल्याचे सुभाष वोरा यांनी सांगितले. भालजी पेंढारकर यांचे गुरू बाबाराव सावरकर यांचे सांगलीतील स्मारक उद्घाटनासाठी अटल बिहार वाजपेयी यांना निमंत्रित करण्यासाठी फोन करण्यात आला. निमंत्रण देत असताना भालजी पेंढारकर कोण आहेत, हे फोनवरून सांगितले जात असताना वाजपेयी म्हणाले, भालजी कौन है ये मुझे मत बताओ भाषण कैसे करना है ये उन्हींसे  मैंने सिखा है। भालजी पेंढारकर यांच्या खास निमंत्रणावरून वाजपेयी दिल्लीवरून सांगलीला या कार्यक्रमासाठी आले होते.