Sun, Jul 21, 2019 01:28होमपेज › Kolhapur › इंधन दरवाढ विरोधात जनआंदोलन

इंधन दरवाढ विरोधात जनआंदोलन

Published On: May 28 2018 1:42AM | Last Updated: May 28 2018 12:35AMकोल्हापूर : प्रतिनिधी

दररोज होणार्‍या पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता भरडली जात आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ लवकरच तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत रविवारी घेण्यात आला. अध्यक्षस्थानी महापौर सौ. शोभा बोंद्रे होत्या. मिरजकर तिकटी येथील ‘हिंदू एकता’च्या कार्यालयात  बैठक झाली. कृती समितीचे निमंत्रक आर. के.पोवार म्हणाले, डिसेंबर महिन्यापासून आतापर्यंत, म्हणजे गेल्या पाच महिन्यांत पेट्रोल-डिझेलच्या दरांत जवळपास 10 रुपयांनी वाढ झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांना याची मोठी झळ बसत आहे. दरवाढ होऊ नये यासाठी राज्य, केंद्रातील सरकारे कोणत्याही उपाययोजना करण्यास तयार नाही. त्यामुळे जनआंदोलन उभारावे लागत आहे. हे आंदोलन कोणत्या प्रकारचे असेल, यासंदर्भात दोन ते तीन दिवसांत महापौर, उपमहापौर, कृती समिती, नगरसेवक यांची बैठक घेऊन आंदोलनाची तारीख जाहीर केली जाईल. 

महापौर सौ. बोंद्रे म्हणाल्या, सर्वसामान्य जनतेचा हा प्रश्‍न आहे. यासाठी कृती समितीतर्फे जनआंदोलन उभारण्यात येत आहे. त्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल. उपमहापौर महेश सावंत यांनी आंदोलनामध्ये सर्व नगरसेवक सहभागी होतील. शेकापचे बाबासाहेब देवकर म्हणाले,  इंधन दरवाढीचा दुहेरी फटका नागरिकांना बसत आहे. यामध्ये ग्राहक, शेतकरी भरडला जात आहे. कृती समितीच्या वतीने ज्या दिवशी आंदोलन  केले जाईल, त्यावेळी मोठ्या संख्येने सहभागी होऊ. 

कॉ. दिलीप पवार म्हणाले, सरकारला जाग येईल, अशा पद्धतीने आंदोलन करावे. त्यामध्ये आम्ही सर्व सहभागी होऊ. उद्योगपती पारस ओसवाल यांनी, केंद्र सरकारने ‘एक देश एक कर’ प्रणाली लागू केली आहे. मग पेट्रोल-डिझेलच्या बाबतीत का नाही, असा सवाल उपस्थित करून विविध करांमुळे ही दरवाढ होत असल्याने आंदोलनात कोल्हापूर कॉलिंगच्या वतीने सर्व जण सहभागी होऊ. नगरसेवक प्रा. जयंत पाटील म्हणाले, डॉ. मनमोहन सिंग यांचे सरकार असताना क्रुड ऑईलचे दर जास्त होते; पण त्यावेळी पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ होऊ दिली नाही. आता क्रुड ऑलईचे दर कमी असतानाही पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ केली जात आहे. शहरातील पेठा, उपनगरांमध्ये जनजागृती करावी. 

अ‍ॅड. महादेवराव आडगुळे म्हणाले, इंधन दरवाढीमुळे जनतेच्या खिशाला कात्री लावण्याचे काम सरकारकडून सुरू आहे. पेट्रोलियम कंपन्या, सरकारकडून जनतेची लूट सुरू आहे. अ‍ॅड. प्रकाश मोरे म्हणाले, सरकारने पेट्रोल-डिझेलवर वेगवेगळ्या पद्धतीचे कर लावले आहेत. हे कर कमी करण्याची गरज असून, आंदोलनातून त्याची मागणी करावी. बाबा पार्टे यांनी आंदोलनात सहभागी होत असताना सायकलीवरून यावे, ज्यांना शक्य आहे, त्यांनी बैलगाडीत मोटारसायकल ठेवून आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. महापालिकेतील सभागृह नेता दिलीप पोवार, किशोर घाटगे, राजू जाधव, विक्रम जरग, अशोक भंडारे, किशोर घाटगे, जयकुमार शिंदे यांनीही मार्गदर्शन केले. बैठकीला चंद्रकांत बराले, बबन लगारे, संजय साळोखे, रमेश पोवार आदी उपस्थित होते. आभार अशोक पोवार यांनी मानले.