Sat, Jul 20, 2019 23:25होमपेज › Kolhapur › शासन आदेशांविरोधात राज्यव्यापी जनआंदोलन

शासन आदेशांविरोधात राज्यव्यापी जनआंदोलन

Published On: Dec 24 2017 1:44AM | Last Updated: Dec 24 2017 12:17AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

शिक्षणासह इतर जाचक शासन आदेशांविरोधात विद्यार्थी, पालक, शिक्षक व नागरी संघटनांचे एकत्रित राज्यव्यापी जनआंदोलन उभारण्याचा निर्णय शिक्षण बचाव कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. 27 डिसेंबर रोजी शिवाजी चौकात शासन आदेशाची होळी व पंधरा दिवसांत राज्यव्यापी शिक्षण परिषद घेण्याचा निर्णय झाला.

सरकारी शाळा बंद व खासगी कंपन्यांना शाळा सुरू करण्याची परवानगी दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारी (दि. 23) शिक्षक संघटना पदाधिकार्‍यांची बैठक झाली. ‘आयफेटो’चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रभाकर म्हणाले, संघटनांनी प्रश्‍न वेगळे केल्याने सगळे अडकून बसले आहेत. किमान प्रश्‍नांवर एकजूट करून आंदोलन उभारावे.

प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे म्हणाले, कंपन्यांना शाळा सुरू करण्यास परवानगी देऊन गरिबांचे शिक्षण शासन धनिकांच्या हातात देत आहे. यामुळे बहुजनांचे शिक्षण बंद पडणार आहे. हा कुटिल डाव हाणून पाडला पाहिजे. महानगर माध्यमिक शिक्षक संघटना सचिव अनिल चव्हाण म्हणाले, खासगी कंपन्यांनी शाळा काढून गरिबांना मोफत शिक्षण द्यावे. डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे राजेंद्र यादव यांनी शासन धोरणाविरोधात पालकांचे प्रबोधन करण्याची सूचना मांडली. 

राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील म्हणाले, शासन बहुजनांच्या शिक्षणाचे वाटोळे करीत आहे. ‘आरटीई’ कायद्याला तिलांजली देणारा हा निर्णय आहे. शिक्षणावरील खर्च कमी करून जबाबदारी टाळत आहे. प्राथमिक शिक्षक महासंघाचे विभागीय अध्यक्ष राजेंद्र कोरे म्हणाले, शिक्षणाचे बाजारीकरण सुरू आहे. खासगी कंपन्यांनी सुरू केलेल्या शाळांत गरीब विद्यार्थी कसे टिकणार? शिक्षणमंत्री, सचिव आणि आयुक्‍त यांच्यात ताळमेळ नाही. महापालिका प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष सुधाकर सावंत म्हणाले, सरकारकडून 15 वर्षांत कालबद्ध नियोजन सुरू आहे.

समाजात शिक्षकांची बदनामी करून वितुष्ट निर्माण केले जात आहे. शिक्षणाचे मारेकरू ठरण्यापेक्षा याला विरोध करावा. प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अर्जुन पाटील म्हणाले, या निर्णयामुळे सुरक्षेच्या कारणास्तव मुलींचे शिक्षण बंद होणार आहे. निमंत्रक गिरीश फोंडे यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. प्रशांत आंबी यांनी आभार मानले.