Tue, Mar 26, 2019 01:34होमपेज › Kolhapur › कर्ज बुडव्यांवर दंडात्मक कारवाई गरजेची : वाय. व्ही. रेड्डी 

कर्ज बुडव्यांवर दंडात्मक कारवाई गरजेची : वाय. व्ही. रेड्डी 

Published On: Jun 11 2018 1:06AM | Last Updated: Jun 10 2018 11:17PMकोल्हापूर : प्रतिनिधी

बँकेचे कर्ज बुडवणार्‍यांना केवळ शिक्षा करून उपयोग नाही तर दंडात्मक कारवाई होणे गरजेचे आहे, असे मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर वाय. व्ही. रेड्डी यांनी व्यक्त केले.  रिझर्व्ह बँक तसेच राज्य शासन यांनी समन्वयाने काम केल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले. शिवाजी विद्यापीठ बँक ऑफ इंडिया अध्यासनाच्या वतीने आयोजित ‘बँकांच्या सुरक्षितता’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी रिझर्व्ह बँकेच्या माजी  डेप्युटी गव्हर्नर सौ. उषा थोरात, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे उपस्थित होते.

रेड्डी म्हणाले,  बँका  सुरक्षितच आहेत पण बँका अडचणीत आहेत अशी मानसिकता तयार केली जात आहे. 1996 पर्यंतची बँकांची स्थिती ही दयनीय होती. अनेक बँकांच्या आर्थिक व्यवहारांच्या नोंदी योग्य पध्दतीने  ठेवल्या जात नव्हत्या. बँकांची कर्जे, कर्जावरील व्याज, एनपीएची आकडेवारी उपलब्ध नव्हती.  पण कालांतराने रिझर्व्ह बँकेने यासाठी प्रयत्न केले. बँकांची विश्‍वासार्हता, स्थैर्य व सातत्य राहण्यासाठी योजना तयार केल्या.

बँकांची कार्यप्रणाली निश्‍चित केली. म्हणून 2008 साली जागतिक मंदीतही परदेशातील बँका बंद पडल्या  पण भारतातील एकही बँक बंद पडली नाही. नागरी बँकांवर लोकांचा विश्‍वास आहे, तो कायम रहावा. या बँकांवर नियंत्रण करणारे सभासद असतात. त्यांनी बँका चालविण्याची पारंपरिक पध्दती बाजूला ठेवून  कंपनी कायद्यानुसार बँकांचे काम चालविले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.  कुलगुरू डॉ. शिंदे यांनी प्रास्ताविक केले. आभार प्रा. विजय ककडे यांनी मानले.  यावेळी डॉ. यशवंतराव थोरात, प्र.कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के व बँकिंग, उद्योग आदी क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते.