Wed, Jul 24, 2019 05:57होमपेज › Kolhapur › शेतमजुरांना किमान वेतन द्या

शेतमजुरांना किमान वेतन द्या

Published On: Jun 07 2018 2:05AM | Last Updated: Jun 06 2018 11:24PMकोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यात शेतमजुरांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून या शेतमजुरांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळावे, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा शेतमजूर युनियनतर्फे मोर्चाद्वारे करण्यात आली. शेतमजुरांच्या विविध प्रश्‍नांबाबत तहसीलदार जीवन बिराजदार यांना निवेदन देण्यात आले.

टाऊन हॉल बाग येथून मोर्चाला प्रारंभ झाला. दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, अ‍ॅसेंब्ली रोड, जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावरून हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये महिला मजुरांचा सहभाग लक्षणीय होता. शेतमजुरांना  किमान वेतन वेतन मिळालेच पाहिजे, बेघर मजुरांना हक्‍काचे घर मिळालेच पाहीजे, यासारख्या घोषणा देण्यात आल्या. शेतमजुरांच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे शासनाच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ विविध घोषणा देत ठिय्या मांडला. याबाबतच्या निवेदनात, ‘शेतमजुरांना आरोग्याच्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून द्यावे, शेतमजूर महिलांना बाळंतपणाची रजा व आर्थिक सहाय्य मिळावे, मनरेगा अंतर्गत कामे देण्यात यावीत, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.यावेळी कॉ. दिलीप पवार, एस. बी. पाटील, प्रा. मेघा पानसरे, रघुनाथ देशिंगे, सुशीला यादव, मौला नदाफ, एम. बी. पडवळे यांच्यासह शेतमजुरांची  उपस्थिती होती.