Mon, May 27, 2019 08:41होमपेज › Kolhapur › मराठा आरक्षण आंदोलन पवार यांनी घेतली माहिती

मराठा आरक्षण आंदोलन पवार यांनी घेतली माहिती

Published On: Jul 28 2018 1:55AM | Last Updated: Jul 28 2018 1:51AMकोल्हापूर : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे शुक्रवारी कोल्हापुरात स्वागत करण्यात आले. रात्री सव्वाआठच्या सुमारास त्यांचे हॉटेल पंचशीलमध्ये आगमन झाले.
जिल्ह्याच्या दौर्‍यावर आलेल्या पवार यांनी, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी राज्यभर सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाची कोल्हापुरातील स्थितीची माहिती  घेतली. इतरत्र या आंदोलनाला हिंसक वळण लागले असताना कोल्हापुरात मात्र हे आंदोलन शांततेत सुरू असल्याची माहिती आ. हसन मुश्रीफ यांनी त्यांना दिली.

जिल्ह्यात पाऊस कसा झाला, सगळी धरणे भरली का, याचीही माहिती त्यांनी घेतली. कागल तालुक्यातील एक धरण वगळता इतर धरणे भरल्याची माहिती त्यांना देण्यात आली. शिरोळ तालुक्यात अलीकडे वाढलेल्या कॅन्सर रुग्णांबाबत त्यांनी विचारणा केली. याच तालुक्यात एवढे रुग्ण का आढळतात, त्यावर काही उपाययोजना केल्या का नाही, याचीही चौकशी त्यांनी केली. दूषित पाणी व पिकांवर फवारल्या जाणार्‍या औषधांमुळे हे प्रमाण वाढल्याचे माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांनी पवार यांना सांगितले. इचलकरंजीतील वस्त्रोद्योगासमोरील अडचणी त्यांना सांगण्यात आल्या.

आज आंदोलनस्थळी भेट देणार

मराठा समाजाच्या वतीने दसरा चौकात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला पवार शनिवारी (ता. 28) सकाळी दहा वाजता भेट देणार आहेत. गेल्या चार दिवसांपासून हे आंदोलन सुरू असून, सर्व स्तरातील लोकांचा त्याला पाठिंबा मिळत असल्याची माहिती त्यांना देण्यात आली.

यावेळी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फायनान्सचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आर. के. पोवार, उद्योजक कांतिलाल चोरडिया, महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा सौ. संगीता खाडे, शहराध्यक्ष राजू लाटकर, जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, माजी नगरसेवक आदिल फरास, अनिल कदम, अनिल साळोखे, युवक राष्ट्रवादीचे रोहित पाटील, वहिदा मुजावर आदी उपस्थित होते.