Thu, Jul 18, 2019 10:40होमपेज › Kolhapur › निवडणुका आल्यावर पवारांना जात आठवते

निवडणुका आल्यावर पवारांना जात आठवते

Published On: Jun 12 2018 12:51AM | Last Updated: Jun 12 2018 12:49AMकोल्हापूर : प्रतिनिधी

गेल्या चार वर्षांत भारतीय जनता पक्षाने दमदार कामगिरी केली आहे. प्रत्येक निवडणुकीत मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिला असून, त्यामुळे अनेकांना पोटशूळ उठला आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे जाणते आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करू नये. पवारांना निवडणुका आल्या की, जात आठवते. भाजपच्या विजयी घोडदौडीमुळे पवार निराश आहेत, अशी घणाघाती टीका पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी सोमवारी केली.

छत्रपती राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अभ्यागत समितीची बैठक झाली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पुणे येथे राष्ट्रवादी पक्षाचा वर्धापन दिन सोहळा नुकताच झाला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी भाजपवर टीका केली होती. त्याला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात प्रत्युत्तर दिले.

पालकमंत्री पाटील म्हणाले, भाजपचा पराभव करण्यासाठी आरक्षणापासून जातीपर्यंत राजकारण होत आहे. शरद पवार हे देखील मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री व पंतप्रधान या पदांना उंची असते, त्यामुळे पवारांना असे बोलणे शोभत नाही. अशा नेत्यांना धमकी आल्यानंतर काही गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतात. त्याबाबत जाहीर कार्यक्रमात बोलणे चुकीचे आहे. शरद पवारांना निवडणुका जवळ आल्या की, जात आणि आरक्षणाची आठवण होते. आरक्षणाचा प्रश्‍न हा काँग्रेस आघाडीच्या काळापासून प्रलंबित आहे. त्यांनी हा प्रश्‍न सोडवला नाही. आमच्याकडून मात्र चार वर्षांत अपेक्षा केली जाते. आरक्षणासह सीमा प्रश्‍नदेखील आघाडीला सोडविता आलेला नाही. आरक्षणाची कोर्टात लढाई सुरू असून, सर्वच स्तरावर मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत.

ईव्हीएममुळे आपला पराभव होत आहे, अशी ओरड विरोधक करत आहेत. पंजाबमध्ये काँग्रेस जिंकले त्यावेळी ईव्हीएमवर आरोप झाले नाहीत. पालघरमध्ये भाजपचा उमेदवार विजयी झाल्यावर मात्र विरोधकांना ईव्हीएमचा घोटाळा दिसतो. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावरील तक्रारीत तथ्य असल्यामुळेच ते दोन वर्षे तुरुंगात राहिले. न्यायालयाच्या लढाईमुळेच ते जामिनावर बाहेर आले, असेही पाटील यांनी सांगितले.

भाजप औषधालाही राहणार नाही, असे म्हणणार्‍या खा. राजू शेट्टी यांनी स्वत:च्या विजयाची काळजी करावी. भाजपने राजू शेट्टींच्या मतदार संघात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दमदार कामगिरी केली असून, 19 ग्रामपंचायतींवर झेंडा फडकविला आहे. शेट्टींनी भाजपची चिंता करू नये, आम्ही समर्थ आहोत, असेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. यावेळी आ. अमल महाडिक, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव उपस्थित होते.