Thu, Sep 19, 2019 03:56



होमपेज › Kolhapur › ‘तुमचं ठरलंय तर मी बी ध्यानात ठेवलंय’: मंडलिक

‘तुमचं ठरलंय तर मी बी ध्यानात ठेवलंय’: मंडलिक

Published On: Jun 13 2019 1:33AM | Last Updated: Jun 13 2019 10:11AM




गडहिंग्लज : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसचे नेते आ. सतेज पाटील यांनी ‘आमचं ठरलंय’ असे म्हणून आम्हाला साथ दिली. याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘तुमचं ठरलंय तर मी बी ध्यानात ठेवलंय’ असे म्हणून जणू धमकीच दिली होती. आता निवडणुकीचा निकाल लागला असून त्यांना ध्यानातच ठेवायचे असेल, तर 2009 व 2019 चा राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव त्यांनी ध्यानात ठेवावा, असा टोला खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी लगावला. 

गडहिंग्लज येथे नगरपालिकेच्या सभागृहात आयोजित केलेल्या विजयी सभेत ते बोलत होते. स्वागत दिलीप माने यांनी केले. यावेेळी  खा. मंडलिक म्हणाले, या उपविभागातील प्रश्‍न सोडविणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे. कोल्हापूरच्या स्वाभिमानाला डिवचले तर काय होते, ते या निवडणुकीने दाखवून दिले असून उन्मत्तांना घरी बसविण्याचे काम स्वाभिमानी जनतेने केले आहे. सर्वांनी मनाने निर्णय घेतल्यानेच हा मोठा विजय शक्य झाला आहे.

आगामी काळात संपूर्ण जिल्ह्यात भाजप व शिवसेनेचेच आमदार असणार असून कागल व चंदगड या भागांवर या युतीचेच उमेदवार विजयी होतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला. या कार्यक्रमावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्यासह प्रकाश चव्हाण, बी. एम. पाटील, प्रा. सुनील शिंत्रे, संग्रामसिंह कुपेकर, प्रभाकर खांडेकर, अ‍ॅड. हेमंत कोलेकर, उपसभापती विद्याधर गुरबे, राजेंद्र तारळे, सोमगोंडा आरबोळे यांनी मनोगत व्यक्‍त केले. यावेळी खा. मंडलिक यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास तालुक्यातील शिवसेना, भाजप तसेच अन्य पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.