Sat, May 25, 2019 22:46होमपेज › Kolhapur › पानसरे हत्याप्रकरण: पवार, अकोळकर फरार

पानसरे हत्याप्रकरण: पवार, अकोळकर फरार

Published On: Jan 05 2018 1:12AM | Last Updated: Jan 05 2018 2:26AM

बुकमार्क करा
कोल्हापूर :

ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉ. गोविंद पानसरे यांचे संशयित मारेकरी विनय बाबुराव पवार व सारंग दिलीप अकोळकर यांना येथील जिल्हा न्यायालयाने गुरुवारी फरारी घोषित केले. कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या घटनेपासून संशयित फरारी आहेत. खटल्यातील आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्या जामीन अर्जावर 19 जानेवारीला सुनावणी होणार आहे. जिल्हा न्यायाधीश (2) एल. डी. बिले यांनी हा आदेश दिला. न्यायालयीन आदेशामुळे  संशयितांना त्यांच्या छायाचित्रासह फरारी घोषित करण्याची प्रक्रिया तपास यंत्रणेमार्फत होईल, त्यानंतर त्यांच्या मालमत्तेवर टाच आणण्यात येईल, असेही विशेष सरकारी वकिलांनी स्पष्ट केले.

कॉ. पानसरे यांच्या हत्येनंतर संशयितांच्या शोधासाठी ‘एसआयटी’मार्फत प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यातही शोधमोहीम राबविण्यात आली. तथापि, त्यांचा सुगावा लागला नव्हता. सातारा पोलिस अधीक्षक व पुणे शहर पोलिस आयुक्‍तांमार्फतही 30 दिवसांत संशयितांनी तपास पथकासमोर हजर होण्याची नोटीस बजावली; पण आदेशाचे उल्लंघन करून संशयित फरारी राहिले.

सहायक तपासाधिकारी तथा अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांनी जिल्हा न्यायाधीश (2) बिले यांच्या न्यायालयात संशयितांना फरारी घोषित करण्याची मागणी पत्राद्वारे केली. त्यात म्हटले आहे की, कॉ.पानसरे हत्येप्रकरणी पवार, अकोळकर हे प्रत्यक्ष सहभागी असल्याचे पुरावे तपासात निष्पन्‍न झाले आहेत. संशयितांच्या शोधासाठी विशेष पथकाद्वारे प्रयत्न होऊनही त्यांचा छडा लागत नाही.

सीआरपीसी 82 प्रमाणे न्यायालयाने दि. 8  ऑगस्ट 2017 रोजी जाहीरनाम्याची कायदेशीर प्रक्रियेची अंमलबजावणी केली. मात्र, संशयित तपास यंत्रणेसमोर हजर राहिले नाहीत की, त्यांचा सुगावा लागला नाही. त्यामुळे संबंधितांना फरारी घोषित करण्याची त्यांनी मागणी केली. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने दोघांना फरारी घोषित केले. यावेळी सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे व आरोपीच्या वतीने अ‍ॅड. समीर पटवर्धन यांनी युक्‍तिवाद केला.