Wed, Jul 24, 2019 07:57होमपेज › Kolhapur › प्लास्टिकच्या कचर्‍यापासून पेव्हिंग ब्लॉक

प्लास्टिकच्या कचर्‍यापासून पेव्हिंग ब्लॉक

Published On: Jul 13 2018 12:48AM | Last Updated: Jul 12 2018 11:43PMयड्राव : वार्ताहर

येथील शरद इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांनी प्लास्टिकच्या कचर्‍यापासून पेव्हिंग ब्लॉक तयार केले आहे. त्यामुळे प्लास्टिकच्या कचर्‍याचा प्रश्‍न निकाली निघण्याचा मार्ग सुकर झाला आहे. तसेच सध्या वाळू मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे सिमेंट पेव्हिंग ब्लॉक उद्योगासमोर आव्हान आहे. शरदच्या विद्यार्थ्यांनी बनविलेले हे पेव्हिंग ब्लॉक प्लास्टिकचे विल्हेवाट लावणारे, वाळू उपशामुळे होणारे नदीचे नुकसान टाळणारे आहे.

प्लास्टिक कचरा नष्ट होण्यास हजारो वर्षे लागतात. त्यामुळे नदी, मृदा, जमीन, वायू यांचे प्रचंड प्रमाणात प्रदूषण होते. तसेच जनावरे, पाळीव प्राण्याच्या पोटात गेल्यावर ते दगावतात. प्लास्टिक कचर्‍याची विल्हेवाट लावणे अडचणीचे झाले आहे. पेव्हिंग ब्लॉकचा वापर वाढला असला तरी वाळू व इतर साहित्याचा तुटवडा आहे. या सर्व प्रश्‍नावर उपाय असणारा प्रोजेक्ट शरद इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांनी करून तो यशस्वी केला आहे. सिव्हिल विभागातील चेतन दळवी, अक्षय पाटील, शुभम रेंदाळे, प्रथमेश वाणी, कपिल गिरंगे या विद्यार्थ्यांनी प्रा. एम. एच. मोता यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प केला आहे.

या विद्यार्थ्यांनी प्लास्टिकच्या पिशव्या, सिमेंटच्या रिकाम्या पिशव्या आदी कचरा गोळा केला. त्यानंतर ते उद्योगामधून वितळवून घेण्यात आले. त्यानंतर ते साच्यामध्ये भरून थंड करण्यात आले. त्यानंतर ब्लॉकवर विविध प्रकारच्या चाचण्या करण्यात आल्या. हे प्लास्टिक पेव्हिंग ब्लॉक सिमेंट ब्लॉकपेक्षा तुलनेत वजनाने हलके आहेत. 70 टनापर्यंत वजन पेलू शकतात. खराब झालेले ब्लॉक रिसायकलिंग करणेही शक्य होणार आहे. या प्रकल्पाची दखल घेऊन राष्ट्रीय स्तरावरील जिज्ञासा 2018 व इनोव्हेशन 2018 स्पर्धेत प्रथम पारितोषिक देण्यात आले आहे.