होमपेज › Kolhapur › काँग्रेस-आवाडे गटात पॅचअप?

काँग्रेस-आवाडे गटात पॅचअप?

Published On: Dec 12 2017 2:05AM | Last Updated: Dec 12 2017 12:07AM

बुकमार्क करा





कोल्हापूर : रणधीर पाटील

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांची त्यांच्या निवासस्थानी घेतलेली भेट... सतेज कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी लावलेली हजेरी...प्रदर्शनाच्या समारोपाला खा. शेट्टी यांनी भूषविलेले अध्यक्षस्थान... आ. सतेज पाटील यांनी हुपरीत आवाडे गटपुरस्कृत कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडीच्या प्रचारात घेतलेली उडी... या सर्व घडामोडी अशाच घडलेल्या नव्हत्या. त्यामागे पक्‍का राजकीय हिशेब होता. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कोल्हापूर दौर्‍यावर येऊन गेलेल्या प्रदेशाध्यक्ष खा.  चव्हाण यांनी पक्षाचे ‘डॅमेज कंट्रोल’ करण्याचा प्रयत्न केला. त्याचे रिझल्टस् आता दिसू लागल्याचे राजकीय जाणकार मानतात. 

अधोगती रोखण्यासाठी धडपड

राजकीय पक्षांमध्ये गटबाजी नवीन नाही. काँग्रेसमध्ये तर ती स्थापनेपासून आहे. या गटबाजीतूनच माजी आमदार महादेवराव महाडिक यांना निलंबित व्हावे लागले. आवाडे गटाने जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर जिल्हा ताराराणी आघाडीची पताका फडकावली. सध्या उरल्या-सुरल्या काँग्रेसमध्येही जिल्हाध्यक्ष माजी आमदार पी. एन. पाटील व आ. सतेज पाटील असे सरळसरळ दोन गट आहेत. अशा गटा-तटांत विभागलेल्या काँग्रेसची जिल्ह्याच्या राजकारणात प्रचंड अधोगती झाली. त्याचा फटका विधानसभा निवडणुकीपासून जिल्हा परिषद निवडणुकीपर्यंत प्रत्येकवेळी बसला.

एकेकाळी जिल्ह्यावर एकहाती सत्ता असणार्‍या काँग्रेसची वाताहत रोखण्यासाठी आतापर्यंत पक्षश्रेष्ठींकडून फारसे गांभीर्याने प्रयत्न झाले नव्हते. खा. चव्हाण यांनी मात्र आपल्या दौर्‍यादरम्यान जिल्ह्यात विस्कटलेल्या काँग्रेसची घडी बसविण्याच्या प्रयत्न केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला गोंजारत आगामी  निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यात भाजपविरोधात मोट बांधण्याचा प्रयत्न केला.

जिल्हा परिषदेची सत्ताही गेली

काँग्रेस जिल्हाध्यक्षपद निवड प्रक्रिया आता होणार आहे. मागीलवेळी जिल्हाध्यक्षपदाच्या निवडणुकीतूनच पी. एन. पाटील व आवाडे गट आमने-सामने आला आणि काँग्रेस कमिटीनेही राडा अनुभवला. त्यातून पक्षात राहूनही पी. एन. पाटील व आवाडे गट एकमेकांशी अंतर राखूनच राहिले. त्यातून पक्षाची अधोगती झाली. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत तर पक्षाची पूर्ण वाताहत झाली. एकाही ठिकाणी पक्षाचा उमेदवार निवडून येऊ शकला नाही. याला विरोधी पक्षांच्या कर्तृत्वापेक्षा काँग्रेस पक्षांतर्गत लाथाळ्याच कारणीभूत होत्या. जिल्हा परिषद निवडणुकीतही काँग्रेसला  सत्ता राखण्यात अपयश आले. आवाडे गटाने घेतलेल्या फारकतीची किंमत काँग्रेसला जिल्हा परिषद निवडणुकीत चुकवावी लागली. 

आवाडे गट-जिल्हा काँग्रेस दोघांनाही एकमेकांची गरज

राजकारणात टिकाव लागायचा असेल, कार्यकर्त्यांची कामे व्हायची असतील व स्वत:लाही आमदार अथवा मंत्री व्हायचे असेल, तर एखाद्या राजकीय पक्षाचे पाठबळ असल्याशिवाय ते शक्य नाही, याची आवाडे गटालाही पूर्णपणे जाणीव आहे. त्यामुळेच भाजप आणि राष्ट्रवादीतील तथाकथित प्रवेश बारगळल्यावर आवाडे यांना सध्यातरी शिवसेना अथवा स्वपक्ष काँग्रेस याशिवाय दुसरा पर्याय नाही. शिवसेनेचा पर्याय आवाडे गट स्वीकारण्याची शक्यता नाहीच्या बरोबर आहे.  

दुसरीकडे, काँग्रेसही गटा-तटांमुळे जर्जर झाली आहे. करवीर व गगनबावडा तालुका वगळता जिल्ह्यात काँग्रेसची पूर्णपणे वाताहत झाली आहे. आवाडे गट पुन्हा काँग्रेसच्या प्रवाहात आल्यास हातकणंगले, शिरोळ व इचलकरंजीमध्ये पक्षाची स्थिती मजबूत होऊ शकते. त्यामुळे सध्या आवाडे व काँग्रेस या दोहोंनाही एकमेकांची गरज आहे, हे स्पष्ट आहे. त्याच द‍ृष्टिकोनातून आ. सतेज पाटील यांनी हुपरीत आवाडे गट पुरस्कृत जिल्हा ताराराणी विकास आघाडीसाठी केलेल्या प्रचाराकडे पाहिले जाते. ताराराणी आघाडीचे उमेदवार काँग्रेसचेच असल्याचेही त्यांनी सांगितले. आवाडे स्वगृही परतण्याची शक्यताही त्यामुळेच बळावली आहे. तसे झाले, तर जिल्हा परिषदेतील राजकारणही बदलायला वेळ लागणार नाही.

भाजप, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रोखला आवाडेंचा पक्ष प्रवेश?

जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप आघाडीला पाठिंबा दिल्यानंतर आवाडे गट भाजपमध्ये जाणार, अशी चर्चा रंगली. तशाप्रकारची सूचक वक्‍तव्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही येत होती; पण भाजपच्या स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनी आवाडेंच्या भाजप प्रवेशाला कडाडून विरोध केल्याचे बोलले जाते. तीच अवस्था राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशावेळीही झाली. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या आवाडे गटाने जवाहर साखर कारखान्याच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत जंगी मेळावा घेऊन विरोधकांना आपली ताकद दाखवून दिली. 

जिल्हा परिषदेत आवाडे गटाची भाजपला रसद

काँग्रेसशी फारकत घेतल्यानंतर आवाडे यांनी जिल्हा परिषद निवडणूक जिल्हा ताराराणी आघाडीच्या माध्यमातून लढवली. या निवडणुकीत त्यांना दोन जागा मिळाल्या; पण या दोन जागांनीच जिल्हा परिषदेतील सत्तेचे गणित बदलले. आवाडे यांनी आपली ताकद भाजपच्या मागे लावली. त्यामुळे भाजपला सत्ता स्थापन करणे शक्य झाले. आवाडे यांचे मन वळविण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी जंगजंग पछाडले; पण आवाडे यांनी  जिल्हा परिषदेत भाजपला मदत करून पी. एन. पाटील यांच्याविरोधातील राग व्यक्‍त केला.