Wed, Jul 17, 2019 18:04होमपेज › Kolhapur › शहरात पार्किंग व्यवस्थेचा बोजवारा

शहरात पार्किंग व्यवस्थेचा बोजवारा

Published On: Apr 29 2018 2:08AM | Last Updated: Apr 29 2018 12:11AMकोल्हापूर : राजेंद्र जोशी

लोकप्रतिनिधींचा बेजबाबदारपणा, महापालिकेची लाचारी आणि नागरिकांची सार्वजनिक गरजेला तिलांजली यामुळे कोल्हापुरात वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. वाहनांची संख्या बेसुमार वाढत असताना त्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज गाडीचे पार्किंग कोठे करायचे, असा प्रश्‍न कोल्हापूरकरांना पडू लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर वाहतूक पोलिसांनी ‘सिंघम’ स्टाईलमध्ये वाहने उचलण्यास सुरुवात केल्याने पोलिसदादा... वाहन कोठे लावू? अशी विचारणा करण्याची वेळ कोल्हापूरकरांवर आली आहे.

कोल्हापुरात वाहनांची संख्या 11 लाखांचा आकडा ओलांडून केव्हाच गेली आहे. या वाहन वाढीचा वेग लक्षात घेऊन शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण करणे, उड्डाण पुलांची शृंखला तयार करणे, बांधकामांसाठी पार्किंग अनिवार्यतेचा नियम काटेकोरपणे राबविणे या पायाभूत सुविधांची गरज असते, पण कोल्हापुरात रस्त्यांचे रुंदीकरण टाळण्यासाठी लोकप्रतिनिधी आघाडीवर असल्याचे एक चित्र कोल्हापूरकरांनी पाहिले. बांधकामांचा वेग वाढत असताना पार्किंगच्या जागा क्लोज करून दुकानगाळे निर्माण करण्यासाठी पालिकेतील काही अधिकार्‍यांनी साटेलोटे केले.

उपनगरांत तर नव्या ले-आऊटसाठी अंतर्गत रस्त्यांच्या रुंदीचा 9 मीटरचा नियम बंधनकारक असताना काही अधिकार्‍यांनी त्याची रुंदी सहा मीटरवर आणून उपलब्ध जागेतून विकासकांबरोबर हातमिळवणी केली. या सर्वांचे परिणाम आता कोल्हापुरात दिसू लागले आहेत. शहरातील मध्यवर्ती भागांत तर रस्त्यांवर वाहन पार्किंगसाठी जागाच मिळत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी या सर्वांचे खापर मात्र सर्वसामान्य वाहनधारकांच्या डोक्यावर फोडले जात असून, त्याला शिक्षा भोगावी लागत असल्याने या बेजबाबदार घटकांवर कारवाई कोण करणार, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

शहरामध्ये वाहतुकीला अडथळा निर्माण करणार्‍या गाड्यांचे पार्किंग झाले तर हे प्रश्‍न आणखी जटिल होतात, ही गोष्ट सर्वमान्य आहेच. त्यासाठी कारवाई करणार्‍यांचे हात बांधण्याची गरज नाही. पण गुन्हा एकाचा आणि शिक्षा दुसर्‍याला, अशी स्थिती होत असल्याने यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. शहरात महापालिकेचा वार्षिक अर्थसंकल्प जाहीर होताना बहुमजली पार्किंगच्या गप्पा मारल्या जातात. ठिकठिकाणी पार्किंगच्या सोयी उपलब्ध करण्याचे आश्‍वासन दिले जाते. उड्डाण पूल, भुयारी मार्ग ही कागदोपत्री चित्रेही रंगविण्यात येतात. प्रत्यक्षात मात्र यातील काहीच होत नाही आणि क्षणभरच्या कामासाठी रस्त्याकडेला वाहन लावलेल्या वाहनधारकाची गाडी पोलिसांच्या क्रेनकडून एखादे भक्षक पकडावे, अशा पद्धतीने उचलली जाते. या प्रश्‍नाच्या मुळाशी जाऊन त्याचे उत्तर शोधण्याचे एक आव्हान कोल्हापूरकरांना घ्यावे लागेल. अन्यथा दुचाकी काय, पादचार्‍यांनाही रस्त्यावरून चालणे अशक्य होणार आहे.