Mon, Apr 22, 2019 16:19होमपेज › Kolhapur › प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठी पालक सरसावले

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठी पालक सरसावले

Published On: May 23 2018 1:07AM | Last Updated: May 23 2018 1:00AMकोल्हापूर : प्रतिनिधी

प्राथमिक शिक्षकांच्या शासनाने केलेल्या ऑनलाईन बदल्यांमधील अन्यायाबद्दल शिक्षक संघटनांनंतर आता पालक सरसावले आहेत. मंगळवारी काही गावांतील पालकांनी संबंधित शिक्षकांची बदली रद्द करा, अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी व लोकप्रतिनिधींकडे केली. या बदल्यात बदल करण्याचे अधिकार शासनालाच असल्याचे सांगण्यात आले.

जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदल्यातील घोळ थांबविण्यासाठी यावर्षीपासून शासनाने बदलीची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविली. त्यामुळे यामध्ये जि.प. स्थानिक प्रशासनाला काहीच अधिकार राहिला नाही. केवळ शासनाला माहिती पाठविणे आणि शासनाकडून आलेलेे आदेश लागू करणे एवढीच जि.प. प्राथमिक शिक्षण विभागाची भूमिका आतापर्यंत राहिली आहे. बदल्यांचा दिवस शासनाने जाहीर केला होता; पण त्या दिवशी बदल्या होऊ शकल्या नाहीत. दोन दिवसांनी बदल्यांच्या ऑर्डर ऑनलाईन टाकल्या. पूर्वी बदली झालेल्या शिक्षकांची यादी प्रसिद्ध केली जायची. त्यानंतर बदल्यांचे आदेश निर्गमीत केले जायचे. या मुदतीत झालेली बदली रद्द करण्याचा प्रयत्न शिक्षक करीत असत. यावेळी मात्र सरकारने बदलीची यादीच प्रसिद्ध केली नाही. थेट तालुक्याच्या ठिकाणी बदलीच्या ऑर्डर पाठविल्या.

बदलीची ऑर्डर संबंधित शिक्षकाला मिळाल्यानंतर याबाबत तक्रारी सुरू झाल्या. पहिले दोन दिवस काही शिक्षक संघटनांच्या नेत्यांनी  जि.प. अधिकार्‍यांना भेटून बदल्यांमध्ये शिक्षकांवर झालेला अन्याय दूर करावा, अशी मागणी केली. आता पालकांनी शिक्षकांच्या बदल्यांसदर्भात जि.प. त गर्दी करीत आहेत. दुर्गम भागातील काही ठिकाणी खरोखरच काही शिक्षक चांगले काम करीत आहेत. शाळांचा कायापालट केला आहे. त्यामुळे येथील पालकांचा त्यांच्यावर विश्‍वास बसला आहे. अशा दुर्गम भागातील काही शाळांचे पालक मंगळवारी संबंधित शिक्षकांची बदली रद्द करावी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना भेटले. काही पालकांनी तर जर संबंधित शिक्षकांची बदली रद्द झाली नाही तर आम्ही आमची मुले शाळेतून काढू, असा इशाराही देऊ लागली आहेत. बदल्यांसंदर्भात सर्व अधिकार शासनाला असल्यामुळे अधिकारी केवळ शांतपणे ऐकून घेण्याचे काम करत आहेत.