Wed, Jul 17, 2019 08:05होमपेज › Kolhapur › निकाल लांबणीच्या भीतीने चिंता!

निकाल लांबणीच्या भीतीने चिंता!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सरवडे : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीने  बारावी बोर्ड परीक्षेचे पेपर तपासणी वरील बहिष्कार कायम ठेवल्याने  बारावी  परीक्षेचा निकाल लांबणीवर पडण्याच्या शक्यतेने संबंधित विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

राज्यातील उच्च माध्यमिक (कनिष्ठ महाविद्यालयीन) शिक्षकांच्या  संपाच्या अस्त्रामुळे बारावी बोर्ड परीक्षेचे पेपर तपासणी उशिरा होणार आहे. परिणामी निकाल लांबणार हे निश्‍चित असतानाच महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालय  शिक्षक संघटनेने पेपर तपासणी वरील बहिष्कार कायम ठेवत पेपरचे गठ्ठे बोर्डाकडे जमा केले आहेत. विद्यार्थ्यांच्या पुढील  शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेत अडचणी निर्माण होण्याच्या शक्यतेमुळे संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याकडे  संबंधित यंत्रणा गांभीर्याने लक्ष का देत नाहीत? अशी विचारणा  पालकांतून होत आहे.   
 राज्यात  सुमारे 24 लाख उत्तर पत्रिकांची तपासणी विनाअनुदान महाविद्यालयातील शिक्षकांकडून केली जाते. या पेपर तपासणीस अद्याप सुरुवात झाली नसलेने अन्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. शिक्षकांनी पेपरचे गठ्ठे बोर्डाकडे देऊनही शासकीय यंत्रणा ढिमच आहे. शासनाकडून याबाबत कोणतीही चर्चा अथवा तोडग्याची हालचाल ही नाही. शासन शिक्षक व विद्यार्थ्यांच्या भवितव्याची भाषणापुरतीच भाषा बोलणार का? शासनाच्या शिक्षण विभागाने मूल्यांकनप्राप्त शाळांना तसेच वाढीव तुकडीवर काम करणार्‍या शिक्षकांचे वैयक्‍तिक मान्यतेचे प्रस्ताव मंजूर करावेत. 

गेली अनेक वर्ष बिनपगारी काम करणार्‍या शिक्षकांना वेतन सुरू करावे. या प्रमुख मागणीस यश आल्याशिवाय माघार घेणार नाही अशी भूमिका विनाअनुदान कृती समितीने घेतली आहे. शासनाने संबंधित शिक्षकांचे प्रश्‍न मार्गी लावावेत. संबंधित शिक्षकांच्या मागणीवर तातडीने योग्य तोडगा निघणार का याकडे शिक्षण क्षेत्राचे डोळे लागले आहेत.

Tags : 


  •