कोल्हापूर : प्रतिनिधी
ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या स्मारकासाठी 20 लाख व पापाची तिकटी येथील महात्मा गांधी पुतळा परिसर सुशोभीकरणासाठी 20 लाखांचा निधी चालू बजेटमध्ये धरण्यात आला आहे. तसेच शहरातील ट्रॅफिक सिग्नलजवळ फायबरचे रस्ता दुभाजके बसविण्यासाठी 30 लाख तर रंकाळ्यासाठी 60 लाखांचा निधी दिला जाणार आहे, अशी माहिती काँग्रेस गटनेता शारंगधर देशमुख यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माजी महापौर स्वाती यवलुजे, माजी उपमहापौर अर्जुन माने उपस्थित होते.
स्थायी समिती सभापती आशिष ढवळे यांनी दिलेल्या बजेटमध्ये बदल करण्यात आले आहेत. ढवळे यांनी स्वतःसाठी 2 कोटी 10 लाखांचा निधी घेतला होता. त्याऐवजी त्यांना 85 लाख निधी धरला आहे. ताराराणी आघाडी गटनेता सत्यजित कदम यांनाही दिलेला सव्वादोन कोटींचा निधी कमी करून तो 47 लाखांवर आणला आहे. एकूणच निधी वाटपात समान न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना प्रत्येकी साडेसहा लाखांचा निधी तर विरोधी भाजप-ताराराणी आघाडी आणि शिवसेना नगरसेवकांना प्रत्येकी 5 लाख निधी देण्यात येईल. सॅनिटरी नॅपकीन मशीनसाठी 25 लाख, रस्त्यावरील चेंबरसाठी 25 लाख, लक्ष्मीपुरी भाजी मंडईसाठी 14 लाख, जुना वाशी नाकाजवळील बागेसाठी 7 लाख, महिला स्वच्छतागृहासाठी 15 लाख निधी दिला जाणार आहे, असेही देशमुख यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला नगरसेवक संजय मोहिते, मोहन सालपे, आशपाक आजरेकर आदी उपस्थित होते.