होमपेज › Kolhapur › एसआयटी, एटीएसकडून संयुक्‍त तपास

कॉ. पानसरे हत्येचे कनेक्शन? : मुंबई, पुणे, कर्नाटकात पथके

Published On: Aug 14 2018 1:09AM | Last Updated: Aug 14 2018 1:09AMकोल्हापूर : प्रतिनिधी

स्फोटकांसह देशी बॉम्ब साठाप्रकरणी जेरबंद करण्यात आलेल्या वैभव राऊत, शरद कळसकर व साथीदारांचा ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येशी कनेक्शनचा संशय बळावला आहे. याप्रकरणी एसआयटी व एटीएसकडून संयुक्‍तपणे तपास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे सोमवारी वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर स्थानिक अधिकार्‍यांसह संयुक्‍त पथक मुंबई, पुण्यासह कर्नाटककडे रवाना झाले आहे.

कॉ. पानसरे, ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर, कर्नाटकातील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. एम. एम. कलबुर्गी हत्येच्या मास्टरमाईंडचा लवकर छडा लागण्याची शक्यताही वरिष्ठ सूत्रांकडून व्यक्‍त केली जात आहे. एसआयटी पथकाने रविवारी रात्री एटीएसच्या वरिष्ठाधिकार्‍यांची मुंबईत भेट घेतली. दीड तास चाललेल्या बैठकीत राऊत, कळसकर, सुधन्वा गोंधळेकर याच्या चौकशीत निष्पन्‍न माहितीचा आढावा घेण्यात आला.

कोल्हापूरशी वारंवार संपर्क ठेवण्याचा हेतू काय?

‘एटीएस’ने जेरबंद केलेला संशयित शरद कळसकरचे कोल्हापुरातील बहुतांश वास्तव्य राजारामपुरी परिसरात होते. काहीकाळ याच परिसरातील खासगी फर्मच्या लेथ मशिनवर त्याने फिटर म्हणून काम केल्याची माहिती चौकशीत निष्पन्‍न झाली आहे. या काळात विविध संघटनांशी संबंधित असलेल्या वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकरसह आणखी तीन साथीदारांचा कोल्हापूर शहराशी संपर्क आला होता. वारंवार कोल्हापूरशी संपर्क ठेवण्याचा संशयितांचा हेतू कोणता होता, यावर तपास यंत्रणांनी भर दिला आहे.

शस्त्र संचलनाचा तातडीने  अहवाल मागविला

मे महिन्यात कोल्हापुरात झालेल्या शस्त्र संचलनाचाही एटीएसने स्थानिक पोलिस यंत्रणेकडून तातडीने अहवाल मागविला आहे. संचलनात दाखल हत्यारे कोठून आणण्यात आली होती? शस्त्र संचलनात स्थानिक  कार्यकर्त्यांसह बाहेरील काही व्यक्‍ती सहभागी झाल्या होत्या का? याचाही एटीएसमार्फत शोध घेण्यात येत आहे, असेही वरिष्ठ सूत्रांकडून समजते.

अप्पर पोलिस महासंचालकांच्या आदेशाने संयुक्‍त तपास यंत्रणा

अप्पर पोलिस महासंचालक तथा एसआयटीचे प्रमुख संजीव सिंघल यांनी रविवारी सायंकाळी मुंबईत एसआयटी, एटीएसच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली. दोन्हीही तपास यंत्रणांकडून तपासाचा आढावा घेण्यात आला. कॉ.पानसरे, डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी चौकशीचा आढावा घेण्यात आला. स्फोटक साठा बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितांचा कोल्हापूरसह पुण्यात वारंवार संपर्क राहिल्याने दोन्हीही घटनांचा संयुक्‍त तपास करण्याबाबत निर्देश देण्यात आल्याचेही विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते. तत्कालीन अप्पर पोलिस महासंचालक तथा एसआयटीचे प्रमुख संजयकुमार यांनी, कॉ. पानसरे हत्येप्रकरणी चौकशीला गती दिली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने समीर गायकवाड, डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक केली होती.

नालासोपाराप्रकरणी संशयित स्फोटक साठ्यासह हाताला लागल्याने आणि त्यांचे कोल्हापूरशी कनेक्शन उघड झाल्याने विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या कार्यालयात तपास पथकातील अधिकार्‍यांची धावपळ वाढली आहे. रविवारी रात्री उशिरा तसेच सोमवारी सकाळपासून अधिकार्‍यांच्या बैठकावर बैठका चालल्या आहेत.