Wed, Jul 17, 2019 12:03होमपेज › Kolhapur › पानसरे, दाभोलकर तपासावर सरकारचा दबाव

पानसरे, दाभोलकर तपासावर सरकारचा दबाव

Published On: Apr 21 2018 1:00AM | Last Updated: Apr 21 2018 12:10AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कॉ. पानसरे, डॉ. दाभोलकर, डॉ. कलबुर्गी, लंकेश यांच्या हत्यांच्या तपासावर सरकारचा दबाव असल्याचा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आला. पानसरे, दाभोलकर यांच्या मारेकर्‍यांसह सूत्रधारांवरही कारवाई करा, यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. कष्टकरी जनतेला वेठीस धरणारे सरकार हद्दपार करा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

कॉ. पानसरे, दाभोलकर आदींच्या हत्येचा तपास होत नाही, सूत्रधार सापडत नाहीत, महिला, दलित, अल्पसंख्याकावरील अत्याचारात वाढ होत आहे, शेतीमालाला हमीभाव नाही पेट्रोल-डिझेलची भाववाढ सुरूच आहे, महागाई वाढत चालली आहे, रेशनवरील धान्य कमी केले जात आहे यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे, असा आरोप करत सरकारचा निषेध करत टाऊन हॉल उद्यानापासून मोर्चाला प्रारंभ झाला. ‘जस्टीस फॉर असिफा’ असे फलक अंगावर परिधान करून मोर्चात सहभागी झालेल्या लहान मुली लक्षवेधी ठरल्या. शहराच्या प्रमुख मार्गावरून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. 

यावेळी उमा पानसरे म्हणाल्या, कॉ. पानसरे यांच्यानंतरही आज इतक्या मोठ्या संख्येने लोक आले आहेत, याचा अर्थ पानसरे यांचे विचार आजही जिवंत आहेत, हे स्पष्ट होते. माणूस मारता येतो, पण विचार मारता येत नाही, हेच त्यांना कळत नाही. कॉ. नामदेव गावडे म्हणाले, हे सरकार श्रीमंताचे आहे. कष्टकर्‍यांच्या हिताची मानसिकताच या सरकारकडे नाही. सोलापूरचे प्रवीण मस्तूद म्हणाले, सत्तेत येण्यापूर्वी घसा बसेपर्यंत आमच्या मागण्या करणार्‍या याच लोकांनी सत्तेत आल्यानंतर मात्र, या मागण्यांकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे.यावेळी कॉ. सतीशचंद्र कांबळे, राजेश सहस्रबुद्धे यांची भाषणे झाली. 

यानंतर शिष्टमंडळाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. यावेळी कॉ.पानसरे, दाभोलकर, कलबुर्गी, लंकेश यांच्या हत्याप्रकरणी मारेकरी आणि सूत्रधार असणार्‍या संघटनांच्या प्रमुखांना पकडून शिक्षा करावी, रेशनवरील धान्य पूर्ववत द्यावे, शेतकर्‍यांना शेतीमाला दीडपट हमीभाव द्यावा, सरसकट कर्जमाफी द्यावी, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, शेतकरी, शेतमजुरांना 60 वर्षांनंतर दरमहा पेन्शन द्यावी, मायक्रो फायन्सासची कर्जे माफ करावीत, अंगणवाडी, ग्रा.पं.कामगार, आशा वर्कस् यांना किमान वेतन द्यावे, असंघटित कामगारांना पेन्शन द्यावी, शिक्षणाचे खासगीकरण, धार्मिकीकरण करू नये, शाळा बंदचा निर्णय मागे घ्यावा, रिक्त पदे त्वरित भरावीत आदी विविध मागण्या करण्यात आल्या.

स्थानिक पातळीवरील मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, संबंधित अधिकार्‍यांच्या बैठका घेतल्या जातील असे शिंदे यांनी शिष्टमंडळाला सांगितले. मोर्चात दत्ता मोरे, रघुनाथ कांबळे, गिरीश फोंडे, अनिल चव्हाण, सम्राट मोरे, आदींसह कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यातील भाकपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

 

Tags : kolhapur, kolhapur news, Pansare Dabholkar case, investigation, government pressure,