Sat, Jul 20, 2019 10:53होमपेज › Kolhapur › चिखलकरवाडी येथील  खूनप्रकरणी दोघांना अटक

चिखलकरवाडी येथील  खूनप्रकरणी दोघांना अटक

Published On: Jan 07 2018 2:01AM | Last Updated: Jan 07 2018 1:01AM

बुकमार्क करा
 पन्हाळा :प्रतिनिधी

 बोरगाव पैकी चिखलकरवाडी, ता. पन्हाळा येथील सदाशिव महादेव नायकवडे यांचा शेतजमिनीच्या वादातून शुक्रवारी घरात घुसून गोळ्या घालून खून करण्यात आला. खून प्रकरणी चुलत भाऊ हिंदुराव यशवंत नायकवडे व पुतण्या शशिकांत हिंदुराव नायकवडे यांना शनिवारी पन्हाळा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या डबल बारी दोन बंदुका, कुर्‍हाड तसेच दोन काठ्या जप्त करण्यात आल्या आहेत. पन्हाळा तालुक्यातील उंड्री येथे मृत सदाशिव महादेव नायकवडे व संशयित आरोपी हिंदुराव यशवंत नायकवडे यांची एकत्रित जमीन आहे. या  जमिनीवरून त्यांच्यामध्ये भांडण होते. याबाबत पन्हाळा पोलिसांत अनेकदा गुन्हे नोंद दाखल केले होते.

शुक्रवारीही या दोन्ही कुटुंबांत वाद झाल्याने पन्हाळा पोलिसांत तक्रार देण्यासाठी आले होते, पण राजकीय मध्यस्थ्यामार्फत तडजोड करण्याचे ठरल्याने तक्रार दाखल करण्यात आली नाही. शुक्रवारी रात्री अचानक हिंदुराव यशवंत नायकवडे, शशिकांत हिंदुराव नायकवडे, विक्रम हिंदुराव नायकवडे, सुनंदा हिंदुराव नायकवडे, शीतल शशिकांत नायकवडे यांनी शेजारीच राहणार्‍या सदाशिव नायकवडे कुटुंबातील लोकांना ठार मारण्याच्या हेतूने हवेत गोळीबार केला व दरवाजा फोडून घरात प्रवेश केला.  डबल बारी बंदुकीतून हिंदुराव याने  सदाशिव यांच्यावर तर शशिकांत याने  आक्काताई यांच्यावर गोळीबार केला. यावेळी सदाशिव यांचा मृत्यू  झाला तर आक्काताई या गंभीर जखमी झाल्या. याबाबत पन्हाळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.